चंदगड : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपये चोरट्यानी लांबवले. चंदगड तालुक्यातील इतक्या मोठ्या रक्कमेची ही पहिलीच घटना आहे. शनिवारी दि. ४ रोजीच्या मध्यरात्री कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेत ही घटना घडली. परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाकाबंदी करून नेसरीच्या चौकात चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला पण बॅरिकेड्स तोडून त्यांनी कारसह पलायन केले.
कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने जाळून त्यामधील १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांची रक्कम कॅश बॉक्ससह लंपास केली. हा प्रकार सुरू असताना ई-सर्व्हिस मुळे हा प्रकार जिल्हा पोलिस विभागाला समजताच गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील व नेसरी पोलिस ठाण्याला कळविले. त्यानंतर पाटील यांनी आपल्या यंत्रणेसह चोरट्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली. पण भरधाव वेगामुळे बॅरिकेड्स तोडून चोरट्यांनी कारसह हेब्बाळच्या दिशेने पोबारा केला. दरम्यान चोरट्यांची कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली. यांमध्ये टायर व एअरबॅग फुटल्याने कार हेब्बाळला ( ता. गडहिंग्लज ) सोडून रक्कम घेऊन पळ काढला. पोलिसांनी एम एच ०१, ईबी ९९१८ या क्रमांकाची कार ताब्यात घेतली असून कोवाड, नेसरी, हेब्बाळमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यामधील धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास चालविला आहे.