BhuiBawda Karul ghat closed
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक घाटमार्ग व रस्ते बंद झाले आहेत. दरडी कोसळणे, पुलांवर पाणी साचणे आणि बंधाऱ्यांवरून पाणी वाहणे या कारणामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तळ कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
भुईबावडा आणि करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर फेजीवडे येथे पाणी आल्याने फोंडा घाट बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तळ कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनुस्कुरा घाटातील दरड बाजूला करण्यात आल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडुकली येथे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तसेच काळभैरी मार्गे गडहिंग्लजला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक थांबवली आहे.
हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून संकेश्वरमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. याशिवाय बाजार भोगांव-पोहाळे रोड पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांचा पाण्याचा प्रवाह वाढत असून प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.