कोल्हापूर

कोल्हापूर : केएमटीचे चाक आर्थिकद़ृष्ट्या पंक्चर

दिनेश चोरगे

कोल्हापूर; सतीश सरीकर :  एकेकाळी कोल्हापूरची लाईफलाईन असलेली केएमटी आता बंद होण्याच्या मार्गाने धावत आहे. योग्य आर्थिक नियोजन न केल्याने काही वर्षापूर्वीपर्यंत 129 बसेसच्या ताफ्यासह धावणार्‍या केएमटीची मजल आता केवळ 50 बसेसवर येऊन ठेपली आहे. बस स्टॉपवर प्रवासी आहेत; पण बस नाहीत अशी अवस्था आहे. एकुणच कशाचाच कशाला ताळमेळ बसत नसल्याने केएमटीचे चाक आर्थिकदृष्ट्या पंक्चर झाले आहे. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अधिकारी-कर्मचार्‍यांची अकार्यक्षमता केएमटीच्या अस्ताला कारणीभूत ठरत आहे.

कोल्हापूर शहर व परिसरातील एक लाखांवर प्रवाशांना केएमटी हे अल्पदरात नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचण्याचे हक्काचे सार्वजनिक वाहन होते. शाळा-महाविद्यालयांसाठीही रोज पाच ते सात हजारांवर विद्यार्थी केएमटीनेच ये-जा करत होते. सद्यस्थितीत केएमटीच्या बसेसची संख्या घटली आहे. अक्षरशः 100 आणि 200 रुपयांच्या स्पेअरपार्टसाठी लाखो रुपयांच्या बसेस व्हंड्यावर थांबून आहेत. त्यामुळे ब—ेकडाऊन बसेसही रस्त्यावर दिल्या जात आहेत, तरीही बहुतांश बसेस अक्षरशः फुल्ल भरून धावत असतात. प्रवासी संख्या 30 ते 35 हजार इतकी कमी झाली आहे.

अपेक्षित उत्पन्न नसल्याने पगारासाठीही आता महापालिकेकडे हात पसरावे लागत आहेत. महापालिकेने महिन्याला पावणेदोन कोटी दिले तरच पगार होऊ शकतो. डिझेल दरवाढ, स्पेअर पार्टस्चे वाढलेले दर, वडापची समातंर यंत्रणा आणि कर्मचार्‍यांची उदासिनता, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आदी कारणांनी कोल्हापूरची लाईफलाईन मोडकळीस आली आहे. वेळेत पंक्चर काढले तरच केएमटी सुरळीत धावू शकेल. अन्यथा मोडकळीस आलेली केएमटी शहरातील रस्त्यावर दिसणे मुश्किलीचे बनून इतिहासजमा होईल. केएमटीला ऊर्जितावस्था आणायची असेल, तर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहेत.

आशा… नव्या बसेसची!

केंद्र शासनाच्या योजनेतून केएमटीला 75 बसेस मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. खा. धनंजय महाडिक त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याबरोबरच आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील व आ. जयश्री जाधव यांनी आमदार निधीतून प्रत्येकी 3 अशा 9 बसेससाठी निधी दिला आहे. शासनाकडून आलेल्या पर्यावरण निधीतून 5 इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता केएमटीला नव्या बसेसची आशा लागून राहिली आहे.

तीस वर्षे झाली तरीही रोजंदारच…

केएमटीत 252 कंडक्टर आणि 228 ड्रायव्हर आहेत. त्यापैकी कायम कंडक्टर 151, तर कायम ड्रायव्हर 124 आहेत. रोजंदार (बदली) अनुक्रमे 81 व 80 तर कंत्राटी 20 व 24 आहेत. बदली कंडक्टर आणि ड्रायव्हरला दिवसाला 555 रु. पगार आहे. कंत्राटींना 407 रु. पगार आहे. बदली व कंत्राटी यांना काम केले तरच पगार मिळतो. अनेक बदली ड्रायव्हर, कंडक्टर 1992 पासून केएमटीत कार्यरत आहेत. तब्बल 30 वर्षे झाली, तरीही अद्याप ते कायम झालेले नाहीत. अनेक कर्मचारी रोजंदारीवरच निवृत्त होत आहेत.

निवृत्तांचे 4 कोटी 51 लाख थकीत

केएमटीत दरवर्षी अनेक कर्मचारी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम देणे बंधनकारक आहे. परंतु, पगारासाठी पैशाची चणचण आणि सेवानिवृत्तीची रक्कम कुठून देणार, अशी स्थिती आहे. 2018 ते 2022 या कालावधीत 115 कर्मचारी निवृत्त झाले. त्यांचे तब्बल 4 कोटी 51 लाख रु. देणे लागते. ग्रॅच्युईटी आणि शिल्लक हक्काच्या रजेचा त्यात समावेश आहे. केएमटीची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने दर महिन्याला सगळ्यात मिळून 4 ते 5 लाख रु. दिले जात आहेत. अनेकांनी वयाची साठी ओलांडली असल्याने औषधपाण्यालाही त्यांच्याकडे पैसे नसतात.

केएमटी आस्थापना

मंजूर आस्थापना 881
कायम कार्यरत 397
कायम ड्रायव्हर 124
कायम कंडक्टर 151
ऑफिस स्टाफ 20
वर्कशॉप विभाग 79
ट्रॅफिक विभाग 23
बदली ड्रायव्हर 80
बदली कंडक्टर 81
कंत्राटी ड्रायव्हर 20
कंत्राटी कंडक्टर 24

कोट्यवधीचे भूखंड पडून

कोल्हापूर शहर व परिसरात केएमटीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागा आहेत. केएमटीला आर्थिकद़ृष्ट्या स्थैर्य लाभावे म्हणून उत्पन्नवाढीसाठी या जागा घेऊन ठेवल्या होत्या. परंतु, सद्यस्थितीत या जागा अक्षरशः पडून आहेत. शास्त्रीनगरमधील बुद्ध गार्डन येथे केएमटीची तब्बल 12 एकर जागेत मुख्य यंत्रशाळा आहे. बिंदू चौकात दीड एकर जागेत पे अँड पाकिर्र्ंग केले आहे. राजारामपुरीतील माऊली चौकात 1 एकर 10 गुंठे जागा आहे. ताराराणी चौकातील अयोध्या पार्कजवळ अर्धा एकर जागा, महाराणा प्रताप चौकात 7 हजार चौ. फू. आणि राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये एका ठिकाणी 4 एकर, तर एका ठिकाणी 2 एकर भूखंड आहे.

SCROLL FOR NEXT