Keshavrao Bhosale Natyagriha 
कोल्हापूर

Kolhapur News : केशवराव नाट्यगृहाकडे अद्याप सुरक्षा निकषांचा परवानाच नाही

महापालिकेकडून मनोरंजन विभागाकडे प्रस्ताव देण्यास दिरंगाई

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर २५ कोटी रुपये खर्चून दोन वर्षांनंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारण्यात आले; मात्र बांधकामानंतर नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची वेळ आली, तरी अद्याप सार्वजनिक वापरासाठी सुरक्षित असल्याचा परवाना घेण्यासाठी (प्रीमायसेस लायसन्स) महापालिकेकडून प्रस्तावच दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत नाट्यगृह खुले करण्याची तयारी सुरू असली, तरी कागदावर मात्र नाट्यगृह असुरक्षित असल्याचीच नोंद आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या कलासक्त संकल्पनेतून शंभर वर्षांपूर्वी साकारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री आग लागली. फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षानुसार नाट्यगृहाच्या आवारात ज्वलनशील साहित्य, द्रव्य आढळल्याची नोंद आहे. अशाप्रकारची दुर्घटना घडल्यास प्रेक्षक, कलाकार, कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी लागू असलेल्या निकषपूर्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी परवाना आवश्यक असतो; मात्र २०१४ नंतर नाट्यगृहाच्या सुरक्षा परवान्याचे नूतनीकरण महापालिकेकडून करण्यात आलेले नाही.

गेल्या १२ वर्षांपासून नाट्यगृहाचा कारभार विनापरवानाच सुरू

होता; मात्र आता पुनर्बांधकामामध्ये सुरक्षाविषयक यंत्रणेला प्राधान्य देण्यात आले असूनही परवाना प्रक्रिया करण्यासाठी मात्र महापालिकेने डोळेझाक केल्याचे चित्र आहे.

२०१४ च्या नूतनीकरणानंतर सुरक्षा परवान्यासाठी प्रस्ताव दिला होता; मात्र त्यावेळी काही त्रुटींची पूर्तता झाली नव्हती. आता नव्याने बांधकामानंतर सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या अनुषंगाने सुरक्षा परवान्यासाठी प्रस्ताव देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. नाट्यगृहे खुले करण्यापूर्वी परवाना घेण्याला प्राध्यान्य दिले जाईल.
- रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT