कोल्हापूर

कोल्हापूर – केर्लेपर्यंतचा महामार्ग मृत्यूचा सापळा

Arun Patil

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर-केर्ले या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोणीही वालीच नसल्याने रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांचा, विशेषत: दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आला असून हा मार्ग मृत्यूचा सापळाच बनल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग सध्या केर्ले पाणंद रस्त्यापासून वळविण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी – केर्ले पाणंद रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुुरू आहे. मात्र कोल्हापूर-केर्ले या मार्गाची अवस्था गंभीर बनली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्यायचा कोणी, हा प्रश्न आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग निधी देत नाही; तर प्राधिकरणाने अद्याप देखभाल-दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली नाही.

शिवाजी पूल सोडताच दुरवस्था दिसते. ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. सुमारे चार इंचापासून अगदी फुटापर्यंत भेगा आहेत. वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. वडणगे फाटा, रजपूतवाडी फाटा, आंबेवाडी फाटा, केर्ली फाटा, केर्ले अशा सर्वच ठिकाणी भेगा आहेत. ठिकठिकाणचे डांबर निघाल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खडी पसरली असून रस्ता खडीकरणाचा बनला आहे.

पावसाळ्यात रस्ता खचण्याचा धोका आहे. भेगा अधिक रुंदावण्याचीही शक्यता आहे. काही ठिकाणी सिमेंटने भेगा मुजविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो फारसा उपयुक्त ठरलेला नाही. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण केल्यास रस्त्यावर सुरळीत वाहतूक होण्यास मदत होणार आहे. या मार्गावरून पर्यटनस्थळ पन्हाळा, दख्खनचा राजा जोतिबा, चिले महाराज समाधी अशी धार्मिक आणि पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

वडणगेे, आंबेवाडी, निगवे, चिखली, केर्ली, केर्ले या भागातून दूध, भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी शहरात ये-जा करतात. नोकरीसाठीही मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर अहोरात्र वर्दळ असते. असे असूनही या देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असा आरोप आहे. रस्ता मुळात अरुंद आहे. वाहनांची प्रचंड संख्या आहे. अशातच दुतर्फा फेरीवाले व किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहेत. तसेच दुतर्फा प्लास्टिक कचरा साचल्याने मुख्य रस्त्यावर वाहनधारकांची कसरत सुरू असते. त्यामुळे या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीची खबरदारी घेऊन वाहनधारकांचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी होत आहे.

एनएचआय रस्त्याचे काम करणार

रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्याचे काम सुरू असून कोल्हापूर-केर्ले या रस्त्याचे काम करणार आहोत, असे एनएचआयच्या अधिकार्‍यांनी बैठकीत सांगितल्याचे आ. पी. एन. पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT