सरवडे : मौजे कासारवाडा पाटणकर (ता राधानगरी)येथील ‘सखलाचा माळ’ परिसरात पाच ते सहा फूट खोल खड्डा खोदण्यात आल्याचे आढळून आल्याने नरबळी किंवा पशुबळीशी संबंधित अघोरी प्रकाराची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी प्लास्टिकची पोती, पाण्याच्या बाटल्या आणि अन्य साहित्य आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांच्या तपासातूनच सत्य समोर येणार आहे.
गावातील ग्रामस्थ वैरणीसाठी या परिसरात गेले असता त्यांच्या निदर्शनास हा संशयास्पद प्रकार आला. त्यानंतर या घटनेची माहिती संबंधितांना देण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यवाहक रेश्मा खाडे यांनी घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. केवळ अघोरी विधी किंवा बळीच्या संशयावरून निष्कर्ष काढण्याऐवजी घटनास्थळाची शास्त्रीय तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले आहे.
यावेळी समितीचे जिल्हा कार्यवाहक हर्षद जाधव, पोलीस पाटील सचिन गुरव, माजी सरपंच शरदराव पाडळकर, स्वप्नील पोवार, दत्तात्रय आकनुरकर यांच्यासह संबंधित ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच श्पारी डळकर यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करताना, राधानगरी तालुका हा छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा परिसर आहे. अशा भूमीत धनप्राप्तीच्या लालसेतून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असतील, तर ते अत्यंत गंभीर आहे, अशी भूमिका मांडली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
अंधश्रद्धेच्या सावटाला आळा घालण्याची गरज!
अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडत असेल, तर त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या खड्ड्यावरून किंवा साहित्यावरून नरबळी अथवा पशुबळी झाल्याचा निष्कर्ष अद्याप काढता येणार नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करावेत, खड्डा कोणी व कशासाठी खोदला याचा शोध घ्यावा आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या राधानगरी तालुक्यात अशा संशयास्पद प्रकारांबाबत अफवांपेक्षा सत्याला महत्त्व मिळणे गरजेचे आहे. अंधश्रद्धेला थारा नको आणि निर्दोषांवर विनाकारण संशयही नको—चौकशी निष्पक्ष व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.या घटनेचा पुढील तपास बीट अंमलदार सचिन निकाडे करत आहेत.