सरवडे : कासारपुतळे (ता.राधानगरी)येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांचा तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यांच्यावर कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. मृत्युशी झुंज सुरु असताना रात्री त्यांची प्राणजोत मावळली. सेवेत असताना गावातील पहिल्यांदाच जवानाचे निधन झाल्याने गावासह पंचक्रोशीतील महिला, ग्रामस्थ यांनी जवानाच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आयटीबीएफच्या जवानांनी प्रत्येकी तीन फायर करत मानवंदना दिली.
प्रमोद पाटील हे सन २०११ साली इंडो तिबेटियन बाँर्डर पोलिस फोर्स (आयटीबीएफ )मध्ये भरती झाले होते. त्यांनी मिझोराम, अरुणाचल प्रदेश सिमेवर सेवा बजावली होती सध्या ते उतराखंड येथे सेवा बजावत होते. दसरा सण सुरू होता त्या दरम्यान प्रमोद हे एक महिना सुट्टी साठी गावी आले होते. १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर -गारगोटी रोडवर क्रेशरकडे जाणाऱ्या वळणावर अपघात होऊन डोक्याला मार लागला होता.
त्यांच्यावरती गेले तीन महिने कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा समर्थ,आणि तीन महिन्याची मुलगी चतुर्थी असा परिवार आहे . आज सकाळी मृतदेह कोल्हापूर येथून मुदाळतिट्टा येथे नंतर बेळगावहून आलेल्या आयटीबीएफच्या वाहनाने मृतदेह गावी आणण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली ."प्रमोद पाटील अमर रहे , "भारत माता की जय "अशा घोषणा देण्यात आल्या. न्यू इंग्लिश स्कूल कासारपुतळे प्राथमिक शाळा ,ग्रामपंचायत यांनी मानवंदना दिली.
दूधगंगा नदी तीरावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या जवानाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी आयटीबीएफचे अधिकारी मंगेश यादव व टीम ४४ बीएन यांनी प्रत्येकी तीन फायर करत मानवंदना दिली पोलीस निरीक्षक डी. एन. देशमुख व, सरपंच सुनीता पोवार, विक्रमसिंह आबीटकर, सरपंच रणधिरसिंह मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून जवानास श्रद्धांजली वाहिली.
प्रमोदचा मृतदेह आयटीबीएफच्या जवानांनी घरात आणतात. तिरंगी ध्वजात लपटलेला आपल्या पतीचा मृतदेह पाहताच पत्नी प्रियांका हिने हंबरडा फोडला तर आई -वडील यांचा आक्रोश पाहून उपस्थित महिला, ग्रामस्थांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आयटीबीएफचे अधिकारी मंगेश यादव यांनी मानवंदना दिल्यानंतर तिरंगा ध्वज पत्नी प्रियांका यांच्याकडे दिला तर पाच वर्षाचा मुलगा समर्थ वडिलांच्या मृतदेहास भडाग्नी देत असताना त्याकडे पाहून अनेकांचे मन हेलावून गेले.