Kasari dam water level
विशाळगड : विशाळगड परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कासारी धरण ८२ टक्के भरले असून, धरणातून सध्या १,२०० क्युसेकने पाणी कासारी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आठ बंधारे पाण्याखाली असून पाणलोट क्षेत्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या २४ तासांत कासारी धरण पाणलोट क्षेत्रात ११३ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजपर्यंत एकूण २७४९ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला तरी, धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. सध्या धरणात २.२८ टीएमसी (दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा असून, पाण्याची आवक १४०४ क्युसेक इतकी आहे.
कासारी (गेळवडे) धरण हे शाहूवाडी तालुक्यातील २१ आणि पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनासाठी वरदान ठरले आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. कासारी नदीवर १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, सुमारे ९ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.
कासारी नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे यवलूज, पुनाळ-तिरपण, ठाणे-आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेन हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शाहुवाडी तालुका प्रशासन नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज असून, दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्वरित आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा.- गणेश लव्हे, तहसीलदार
धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी मंजूर धरण द्वार परिचलनानुसार धरणाच्या वक्रद्वाराद्वारे ९०० क्युसेक आणि वीज निर्मिती गृहाद्वारे ३०० क्युसेक, असा एकूण १,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू आहे. यामुळे कासारी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.- मिलिंद किटवाडकर, कासारी धरण व्यवस्थापन