लिंगाचीवाडी परिसरात रस्त्यासाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील खोदकामामुळे १८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी तुटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News : काळम्मावाडी थेट पाईपलाईनची १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी तुटण्याचा धोका; कोल्हापूर मनपा प्रशासनाला निवेदन

खोदकाम प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहराचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काळम्मावाडी-कोल्हापूर थेट जलवाहिनी (Kalammawadi direct pipeline) योजनेच्या सुरक्षेबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. लिंगाचीवाडी परिसरात रस्त्यासाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील खोदकामामुळे १८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी तुटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने चौकशी करण्याची आणि उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पाईपलाईनच्या बाजूनेच मोठे खोदकाम; अपघाताची भीती

या प्रश्‍नी तक्रारदार जितेंद्र डवर यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. यामध्ये नमूद केले आहे की, लिंगाचीवाडी परिसरातून जात असलेल्या थेट पाईपलाईनच्या अगदी बाजूनेच रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. पाईपच्या अत्यंत जवळून खोदाई केल्यामुळे जलवाहिनीला असणारा जमिनीचा आधार कमकुवत झाला आहे. यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

भविष्यात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यावर जलवाहिनीवरील ताण वाढणार

"सध्या या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा बंद असल्याने जलवाहिनी स्थिर आहे. मात्र, भविष्यात जेव्हा पूर्ण क्षमतेने पाणीप्रवाह सुरू होईल, तेव्हा या १८०० मिमी व्यासाच्या महाकाय जलवाहिनीवर पाण्याचा प्रचंड ताण येईल. जमिनीचा आधार नसल्याने ही वाहिनी तुटण्याचा मोठा धोका आहे. जर असे घडले, तर या मार्गावरील प्रवासी आणि वाहनचालकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो," असेही निवेदनात म्हटलं आहे.

खोदकामाच्या चौकशीची मागणी

या खोदकाम प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. जलवाहिनीच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. पाईपलाईनला मजबूत आरसीसी (RCC) आधार द्यावा किंवा ती पुन्हा योग्य पद्धतीने जमिनीत गाडण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशा मागण्याही महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT