कोगीलच्या कोतवालाला लाच घेताना रंगेहाथ अटक 
कोल्हापूर

Kolhapur Bribe Case : कोगीलच्या कोतवालाला लाच घेताना रंगेहाथ अटक

शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद

पुढारी वृत्तसेवा

उजळाईवाडी : सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करून देण्यासाठी एक हजारची लाच घेताना करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुकचा कोतवाल विनोद कृष्णात बामणकर (29, रा. कोगील बुद्रुक) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे कोगील बुद्रुक येथे सात गुंठे शेत जमीन आहे. त्यांच्या आजोबांना ही शेत जमीन तारण देऊन गावातील सहकारी संस्थेकडून तीन महिन्यांपूर्वी पाच लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते. परंतु कर्जाची रक्कम कर्जदाराला अदा करण्यापूर्वीच संस्थेच्या नियमानुसार सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा नोंद झाला होता. परंतु तक्रारदार यांनी गावातील संस्थेकडून मंजूर झालेली रक्कम घेण्यापूर्वीच शासनाच्या एका महामंडळाकडून तीन लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या गट नंबर 531 वरील सातबारा उताऱ्यावर गावातील संस्थेचा नोंद झालेला बोजा कमी करण्यासाठी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी कोतवाल विनोद बामणकर यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्राराची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बुधवारी सापळा रचला. यामध्ये कोतवाल विनोद बामणकर एक हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ सापडला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक उज्वला भडकमकर, सुधीर पाटील, कृष्णा पाटील, संदीप पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT