गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग््राामदैवत धूळसिद्ध बिरदेव देवस्थान वार्षिक यात्रेनिमित्त भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी चांदीची पावले व मंदिराच्या गाभाऱ्यासाठी चौकट अर्पण करून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला विधिवत प्रारंभ झाला.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ढोल, कैताळ व फटाक्यांच्या आतषबाजीत देवमाळीतून धूळसिद्ध बिरदेवाच्या पालखीचे मंदिरात भव्य आगमन झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी भव्य सबीना, हेडाम व भाकणूक विधी पार पडले. भाविकांच्या वतीने धूळसिद्ध बिरदेवाला पोळ्यांचा गोडा नैवेद्य अर्पण करण्यात आला. पालखी मिरवणुकीदरम्यान संयुक्त भगवा चौकात कुणाल दांगट यांच्या नेतृत्वाखाली दोन टनांहून अधिक भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला.महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या धूळसिद्ध बिरदेवाच्या यात्रेदरम्यान दररोज विविध धार्मिक विधी व पारंपरिक कार्यक्रम होत असून, देवाची मुडशिंगी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.