Kadavi Dam at Parle Ninai
परळे निनाई येथील कडवी धरणात ७९.७२ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे.  Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर: ‘कडवी' धरण ८० टक्के भरले; विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथील कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १४५ मिली मीटर पाऊस बरसला. धरणात  ७९.७२ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कडवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १ जून ते आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात १३९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी ९७९ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षी २९ जुलैरोजी धरण १०० टक्के भरले होते. पाणीसाठयात वाढ होत असल्याने धरणातून कडवी नदी पात्रात प्रतिसेकंद २०० क्युसेस पाण्याचा विसर्ग कडवी नदीत सुरू असल्याची माहिती येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.          

कडवी धरणाची २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता

शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आणि बहुतांशी कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरलेल्या कडवी धरणाची २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पाणीपातळी ६०१.२५ मिटर तर पाणीसाठा ७१.२४ दलघमी असतो. सध्या कडवी मध्यम प्रकल्पात २.०१ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात  ४८ टक्के पाणीसाठा होता. परळे-निनाई ते पाटणे बंधारा दरम्यानच्या २२ गावांतील लाभक्षेत्राला सिंचन व पाणी पिण्यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग होतो. तालुक्याच्या पश्चिमेकडील पालेश्वर, कासार्डे व मानोली हे तीन लघू पाटबंधारे तलाव १० जुलैपूर्वीच ओसंडून वाहत आहेत.      

२२ गावांना कडवी प्रकल्प जीवनदायी

कडवी नदीवर सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगाव, सवते-सावर्डे, पाटणे हे आठ बंधारे आहेत. भेंडवडे, परळे-निनाई, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, लोळाणे, निळे, वालूर, कडवे, येलूर, पेरीड, मलकापूर, गाडेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे व शिंपे या २२ गावांना कडवी प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. गतवर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले होते. गुरुवारी (दि १८) रोजी सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ५९७.९० मीटर होती. पाणीसाठा ५६.७९ दलघमी तर २.०१ टीएमसी धरण भरले होते. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

कडवी व कासारी धरणाची स्थिती :

धरण       पाणीपातळी मी     पाणीसाठा दलघमी     टीएमसी   टक्के

कडवी           ५९७.९०               ५६.७९                  २.०१       ८०

कासारी         ६१८.१०               ५४.९२                  १.९४     ६९.९२

SCROLL FOR NEXT