Jotiba Chaitra Yatra 
कोल्हापूर

Jotiba Chaitra Yatra : पंचगंगा नदीचा घाट,जोतिबा भक्तांचा थाट

जोतिबा यात्रा पूर्वदिनी भाविकांचा विसावा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‌‘जोतिबाच्या दर्शनाला जायचं... देवा राजा जोतिबा माझा... चांगभलं...‌’ असा जयघोष, सासनकाठीसोबतच्या नृत्याला हलगीचा ठेका, गुलालाची उधळण आणि ‌‘चांगभलं‌’चा अखंड गजर अशा वातावरणात पंचगंगा घाट भक्तिरसात चिंब झाला. दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी यात्रेकरूंनी पंचगंगा घाटावर विसावा घेतला. नदीत स्नान केल्यानंतर मोफत अन्नछत्रातील मायेचा घास घेऊन यात्रेकरू जोतिबा डोंगराच्या दिशेने मार्गस्थ झाले.

चैत्र पौर्णिमेला जोतिबाची मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांना या यात्रेचे वेध लागतात. मंगळवारपासून यात्रेला प्रारंभ झाला असून बुधवारी (दि. 1 एप्रिल) यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे यात्रेकरू जोतिबाला जाताना पंचगंगा घाटावर विश्रांतीसाठी थांबले होते. कुणी बैलगाड्यांतून तर कुणी टेम्पोतून आले होते. नदीघाट परिसरात यात्रेकरूंच्या विसाव्यासाठी मंडप घालण्यात आले आहेत. तसेच आंघोळ व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून यात्रेकरूंचा विसावा नदीघाटावर आहे.

मंगळवारी सासनकाठी घेऊन येणारे भाविक नदी घाटावर काठीसोबत पारंपरिक नृत्य करत असल्याने सारा परिसर भक्तिमय झाला आहे. महिला भाविकांसाठी आंघोळ व कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सुरक्षित सोय केली आहे. सहकुटुंब आलेल्या यात्रेकरूंनी सहभोजनाचा आस्वाद घेतऊन पुढे यात्रेसाठी मार्गस्थ झाले.

पहिल्या दिवशी मोफत अन्नछत्राचा 20 हजार यात्रेकरूंना लाभ

शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने आयोजित मोफत अन्नछत्रास मंगळवारी प्रारंभ झाला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी 20 हजार यात्रेकरूंनी अन्नछत्राचा लाभ घेतला. दोन एप्रिलपर्यंत अन्नछत्र सुरू राहणार आहे. यासाठी सुनील कदम यांच्यासह 50 आचारी काम करत आहेत, अशी माहिती अन्नछत्रचे अध्यक्ष प्रफुल्ल भेंडे यांनी दिली. उपाध्यक्ष साताप्पा कांबळे, व्यवस्थापक प्रमोद सावंत यांनी नियोजन केले आहे.

दोन दिवसांत बसच्या 300 फेऱ्या

एसटी महामंडळाच्या वतीने यात्रेकरूंसाठी पंचगंगा घाट ते जोतिबा मंदिर या मार्गावर मोफत बससेवा सुरू केली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या सेवेअंतर्गत दोन दिवसांत 300 फेऱ्या करण्यात आल्या. महिला व लहान मुलांसाठी ही सेवा सुरक्षित असल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT