अर्जुनवाडा : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथे गेल्या चार दिवसापासून दूषित पाण्यामूळे काविळसदृश्य आजाराची साथ पसरली आहे. यामुळे रुग्णांना जुलाब, उलट्या, अशक्तपणा आणि ताप अशी लक्षणे दिसत आहेत. आत्तापर्यंत गावातील 10 हून अधिक बाधित रुग्णांच्यावर कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. काही गावातील गटारी आणि प्रकल्पांचे दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत सोडले असल्यामुळे कावीळसदृष्य रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चांदेकरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चांदेकरवाडीत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. दुधगंगा नदी काठावरील अनेक गावांचे थेट गटारीचे आणि मैला मिश्रित पाणी याचबरोबर साखर कारखाना आणि दूध संघ, आणि खासगी प्रकल्पाचे दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत सोडले असल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे.
गावातील काही रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायती आणि प्रकल्पाना लेखी निवेदन चांदेकरवाडी ग्रा.प.ने दिले आहे. काही रूग्णांना तापाची लागण सूरू आहे. दूषित पाण्यामुळेच गावात काविळसदृश्य रुग्ण सापडत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी ङाँ. राजेंद्र शेटे यांनी सांगितले.तर गावात आरोग्य पथक तैनात केले असून रुग्णांची तपासणी सुरू असल्याचे सांगितले.रूग्णांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतने केले आहे.