बाजारभोगाव : नदी उगम क्षेत्रातील अणुस्कुरा घाटमाथा, विशाळगड परिसर, पडसाळी-काजिर्डा घाटमाथा व बाजारभोगाव परिसरात मुसळधार पावसाने उसंत दिलेली नाही. परिणामी, कासारी व जांभळी नद्यांना पूर आला असून, या दोन्हीही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कासारी व जांभळी नद्यांच्या पाण्याच्या पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कासारी नदीवर असणार्या बाजारभोगाव, वाळोली, बांद्रेवाडी बंधार्यांवर पाणी आले आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पश्चिम पन्हाळ्यासह दक्षिण शाहूवाडीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्यास कासारी नदीच्या पुराचे पाणी बाजारभोगाव ते पोहाळे तर्फ बोरगावदरम्यान असलेल्या ‘मोडका वड’ येथील मोरीवर येऊ शकते, त्यामुळे कोल्हापूर -बाजारभोगाव-अणुस्करा- राजापूर हा राज्यमार्ग बंद होऊ शकतो.