भगवान आदिनाथ तीर्थंकरांचा महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात 
कोल्हापूर

Kolhapur News : भगवान आदिनाथ तीर्थंकरांचा महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात

यंदा 65 वे वर्ष : वीस प्रकारच्या सुगंधी द्रव्यांनी अभिषेक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : येथील शुक्रवार पेठेतील सुमारे दोन हजार वर्षे प्राचीन स्वस्तिश्री लक्ष्मीसेन जैन मठात 28 फूट उंचीच्या भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या भव्य मूर्तीवर अक्षयतृतीयेनिमित्त पारंपरिक महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावात झाला. यंदा या सोहळ्याचे 65 वे वर्ष होते. या सोहळ्यात दुग्धाभिषेक, इक्षुरस (उसाचा रस), कुंकूम, हळद, रक्तचंदन, श्वेतचंदन, तसेच सर्वऔषधी, नारिकेल, कषायचूर्ण, कलकचूर्ण आणि अष्टगंध यांसारख्या सुगंधीत द्रव्यांनी सुमारे 18 ते 20 प्रकारचे अभिषेक करण्यात आले. त्यानंतर शांतीधार आणि पुष्पवृष्टी करून वातावरण भक्तिमय झाले.

हा सोहळा आचार्य श्री सकलकीर्तीजी महाराज व आचार्य श्री चंद्रप्रभूसागर महाराज यांच्या सान्निध्यात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मुख्य यजमान म्हणून कांचन भिवटे परिवाराला मान मिळाला. त्यांच्या हस्ते चंद्रप्रभू तीर्थंकर, ज्वाला मालिनी माता आणि आदिनाथ तीर्थंकर यांचा पूर्णाभिषेक करण्यात आला.

सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहणानंतर मुख्य पूजा विधींना सुरुवात झाली. मंदिरातील सर्व मूर्तींवर पंचामृत अभिषेक करण्यात आला. दुपारच्या सत्रात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या पट्टाभिषेकाचा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. यावेळी मठामार्फत दिला जाणारा ‌‘आदर्श दाम्पत्य‌’ पुरस्कार किशोरी व प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात आला.

महामस्तकाभिषेक सोहळ्यास महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने श्रावक-श्राविकांसह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, बेळगावचे आमदार अभय पाटील, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, विशाल शिराळे, रत्नेश शिरोळकर, राजेश लाटकर, प्रतिज्ञा उत्तरे, माधवी गवंडी, संजय शेटे उपस्थित होते.

उत्सव समितीचे बाबुराव मगदूम, सुरेश रोटे, जे. बी. पाटील, संजय आडके, महावीर मगदूम, सूरज माणगावकर, सुरेश मगदूम, अतुल होनोले, विशाल शेटे तसेच शहरातील जिनमंदिरांचे पदाधिकारी व ज्वाला मालिनी महिला मंडळाच्या भगिनींनी संयोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT