कासारवाडी : मागील हंगामातील उसाचा हिशोब कायद्यानुसार देणे बंधनकारक असताना व अद्यापही काही कारखान्यांनी दिलेला नाही. तसेच शुगर केन ऍक्ट १९६६ नुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी स्थानिकच्या दोन वर्तमानपत्रातून उसाचा दर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे. असे असताना वारणा कारखान्याने हंगाम सुरू केल्याने जय शिवराय किसान संघटनेने काही काळ ऊस वाहतूक रोखली होती.
एक नोव्हेंबर २०२५ पासून तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना सुरू केलेला आहे. परवानगी न घेता साखर कारखाना सुरू केल्यामुळे त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. वारणेची ऊस वाहतूक रोखल्यानंतर कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी यावर्षीच्या गळीत हंगामाचा ऊस दर जाहीर करूनच व पाठीमागचा हिशोब देऊनच साखर कारखाना चालू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, स्वाभिमानी शेतमजूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, गब्बर पाटील, शिवाजी आंबेकर, सागर माळी, पांडुरंग इंगळे, तानाजी तेली, बबन माने, विजय पाटील, माणिक पाटील, नामदेव पाटील, कृष्णात पाटील, नानासो इंगळे, उत्तम पाटील, रमेश गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.