कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी गुळाचे दर प्रतिक्विंटल १६०० रुपयांनी घसरले. सौद्यांमध्ये प्रतिक्विंटलचा सरासरी दर ६ हजार रुपये राहिला, तर सुमारे ११ हजार रव्यांची आवक झाली.
बाजार पेठेत साखरेचे दर घसरल्याने बुधवारी गुळाचे दरही घसरले. शनिवारी (दि. २२) निघालेल्या सौद्यात गुळाचा प्रतिक्विंटल दर ७,८०० रुपयांपर्यंत गेला होता. चढ्या दराचा हा गूळ गुजरातच्या बाजारपेठेत गेला. दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुळाची मागणी घटली. याचा परिणाम सोमवारच्या सौद्यावर झाला. गूळ उत्पादक शेतकरी ज्यादा दर मिळाला पाहिजे, या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे व्यापार्यांनी सोमवारी गूळच खरेदी केला नाही. समितीमध्ये गूळ तसाच पडून राहिला. समितीमध्ये बुधवारी सकाळी सौद्यांना सुरुवात झाली. गुजरातहून घटलेली मागणी आणि बाजारपेठेत साखरेचेही दर उतरल्याने गुळाचा दरही घसरला.