सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात महिला दिन साजरा 
कोल्हापूर

Kolhapur News : सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात महिला दिन साजरा

उद्योग, शिक्षण, समाजकार्य, कला, क्रीडा, संशोधनासह विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : एखाद्या ध्येयासाठी आयुष्य वेचत समाजासाठी केलेल्या कार्याचा सन्मान... कष्ट, मेहनतीने कमावलेल्या यशाचे कौतुक आणि नवनिर्मितीतून केलेल्या संशोधनाला दिलेली प्रेरणा अशा वातावरणात रविवारी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांतील आकाश पेलणाऱ्या महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. रोजच्या जगण्यासाठी रस्त्यावर उतरून निष्ठेने काम करणाऱ्या महिलांपासून उद्योग, शिक्षण, समाजकार्य, कला, क्रीडा, संशोधन यासह अनेक क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांच्या सन्मानासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी सकाळपासूनच कुटुंबातील आई, पत्नी, बहीण, मुलगी यांच्यापासून कार्यालयातील सहकारी, मैत्रीण यांना महिला दिनाच्या शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली. दिवसभर काही संस्थांच्या वतीने महिलादिनानिमित्त समाजातील महिलांच्या योगदानाला सत्काररूपातून पावती देण्यात आली. रंगपंचमी आणि महिलादिन एकाच दिवशी आल्यामुळे काही महिलांच्या ग््रुापने एकत्र येत दुहेरी आनंद साजरा केला.

कष्टकरी महिलांचा सन्मान

क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील महालक्ष्मी ग््रुाप रेणुका भक्त मंडळातर्फे शेतातील कष्टकरी महिला, भाजी विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गजानन विभूते, चंद्रकांत बागडी यांनी यावेळी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी रेणुका भक्त मंडळाच्या संयोजिका शोभा विभुते, संगीता खराडे, प्रेरणा माने, रूपाली ओतारी, मनीषा मांगले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

कर्तबगार महिलांना पुरस्कार

दिनेश माळी फाऊंडेशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. राजकारण व समाजकारण यांची सांगड घालून कार्य करणाऱ्या सरला पाटील, सायकलिंगद्वारे प्रबोधन करणाऱ्या विनीता पोतदार, कलाक्षेत्रातील तंत्रज्ञानात कार्यरत शिल्पा सिन्हा, वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी भरारी घेणाऱ्या डॉ. पूजा पाटील व उद्योजिका साधना घाटगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर रूपाराणी निकम, अभिनेते भरत जाधव उपस्थित होते. दिनेश माळी यांनी स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT