कोल्हापूर : विकासवाडी (ता. करवीर) येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने स्टेडियमसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही जागा स्टेडियम उभारणीसाठी हस्तांतरित केली. याबाबतचे आदेश (दि. 2) एप्रिल रोजी काढण्यात आले असून, त्यानुसार सात-बारा दप्तरी तशी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जागेसाठी आवश्यक कागदपत्रांची क्रीडा विभागाने पूर्तता केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत या जागेचा प्रत्यक्ष ताबा क्रीडा विभागाला दिला जाणार आहे.
विकासवाडी येथील दोन गट क्रमांकातील 12.76 हेक्टर म्हणजे सुमारे 31 एकर जमीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन स्टेडियमसाठी हस्तांतरित केली. 11 अटी आणि शर्थीसह ही जमीन आता जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली जाणार असून, त्यांच्यासमवेत क्रीडा उपसंचालक हे करार करणार आहेत. तत्पूर्वी क्रीडा उपसंचालक ही जागा ताब्यात घेणार आहेत. ही प्रक्रिया दोन-तीन दिवसांत होईल, असे करवीर तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. या जागेवर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे. त्याचा आराखडा निश्चित झाला असून, निधीचीही उभारणी लवकरच केली जाणार आहे. पुढील वर्षापासून या स्टेडियमच्या उभारणीचे काम प्रत्यक्ष सुरू होईल, अशी शक्यता आहे.