Almatti Dam 
कोल्हापूर

Kolhapur News : अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा, विसर्गाबाबत आंतरराज्य समन्वयावर भर

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड; पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थितीवर थेट परिणाम करणाऱ्या हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाणी व्यवस्थापन आणि विसर्ग याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील प्रशासनामध्ये सक्षम आणि सातत्यपूर्ण आंतरराज्य समन्वय यंत्रणा कार्यरत आहे. पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाची दैनंदिन माहिती परस्परांना उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध धरणे व नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह कृष्णा नदीत एकत्र येतो. शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यानंतर कृष्णा नदी कर्नाटक राज्यात प्रवेश करते. त्यामुळे कर्नाटकातील हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाणी व्यवस्थापन व विसर्ग यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर थेट परिणाम होतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्हा प्रशासनाशी प्रभावी समन्वय सुरू ठेवला आहे.

डॉ. राठोड म्हणाले, पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांतील जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागामार्फत दैनंदिन पर्जन्यमान, धरणांतील पाणीसाठा, विसर्ग, नदीपात्रातील प्रवाह आदींची नियमित माहिती एकमेकांना पाठविली जात आहे. विविध डिजिटल माध्यमांचा यासाठी प्रभावी वापर केला जात असून आवश्यक माहितीची तत्काळ देवाणघेवाण केली जात आहे. त्यानुसार हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाण्याचे प्रमाण, उपलब्ध साठा आणि विसर्ग याचा दैनंदिन अहवाल कर्नाटककडून जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होत आहे.

याशिवाय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आंतरराज्य समन्वयासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT