सुनील कांबळे
नागाव : कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीत महिला शक्तीचा मोठा वाटा दिसून येत आहे. कोल्हापूर उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले यांसारख्या औद्योगिक वसाहतींत केवळ पुरुषच नव्हे, तर महिलाही मशिनरी हाताळण्यापासून ते व्यवस्थापनापर्यंत सर्वच जबाबदाऱ्या लीलया पेलत आहेत.
एकेकाळी कष्टप्रद मानल्या जाणाऱ्या फौंड्री व्यवसायात महिलांचा वावर मर्यादित होता. मात्र, आता कोल्हापूरच्या अनेक फौंड्री युनिटस्मध्ये कोअर मेकिंग, क्वालिटी कंट्रोल आणि डिझाईन विभागात महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि मसीएनसीफ मशिनरीमुळे महिलांसाठी या क्षेत्रातील कामाच्या संधी विस्तारल्या आहेत. अनेक महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू करून इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला.
उद्योजिकांचा वाढता आत्मविश्वास
उद्योजिका म्हणूनही कोल्हापूरच्या महिला पुढे येत आहेत. जिल्हा उद्योग केंद्र आणि विविध बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेत महिलांनी मसाला उद्योग, फूड प्रोसेसिंग आणि इंजिनिअरिंग जॉब वर्कमध्ये स्थान निर्माण केले आहे. अनेक बचत गटांनी एकत्रित येऊन औद्योगिक पूरक व्यवसाय सुरू केल्याचे सकारात्मक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पुढील आव्हाने आणि संधी
औद्योगिक क्षेत्रात महिलांसाठी अधिक सुरक्षित वाहतूक व्यवस्था, कामाच्या ठिकाणी पाळणाघरे आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणारी केंद्रे वाढवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, जर महिलांना योग्य तांत्रिक शिक्षण दिले, तर कोल्हापूरच्या मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये त्या गेम चेंजर ठरू शकतात. कोल्हापूरच्या औद्योगिक विकासात महिला आता सपोर्ट सिस्टीम नसून मेन स्ट्रीम (मुख्य प्रवाह) बनल्या आहेत. त्यांच्यातील चिकाटी आणि सूक्ष्म कामाची ओढ उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यास मदत करत आहे.