कोल्हापूर

कोल्‍हापूर : आजरा तालुक्यात डोळे येण्याची साथ; शंभराहून अधिक जणांना लागण

निलेश पोतदार

सोहाळे : सचिन कळेकर सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. आजरा तालुक्यातही या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळूहळू डोळ्यांची साथ पसरु लागली असून, रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. लहान मुलांपासून वयोवृध्द व्यक्तींचे डोळे येण्याची म्हणजेच डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे. लहान मुलांनादेखील डोळे येत असल्याने शाळा प्रशासनासमोर चिंतेचा विषय बनला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आजरा तालुक्यात १०८ जणांना लागण झाली आहे. तालुक्यातील उत्तूर भागात रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. १०८ पैकी १२ जण बरे झाले असून, उर्वरीत बाधीत उपचार घेत आहेत. या साथीमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संबंधीतांनी योग्य काळजी घेण्याबरोबरच खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्याचे वातावरण हे अनेक जंतूच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळेच या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगाच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते. हा आजार लहान मुलांमध्येही दिसून येत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने विशेष काळजी घेतली जात आहे. शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला जात आहे. बालस्वास्थ्‍य कार्यक्रमातंर्गत आरोग्य पथके कार्यरत आहेत. लहान मुलांसह मोठ्यांमध्येही डोळे येण्याची साथ पसरत आहे. अनेक विदयार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळा प्रशासनाकडून अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचा सल्ला दिला जात आहे.

आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, आजरा तालुक्यात आजपर्यंत १०८ जणांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे. भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १२ जण , मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात ५ जण, उत्तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात ८४ जण व वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात ७ जण बाधीत आढळून आले आहेत. बाधीतांवर उपचार सुरु असून, त्यातील १२ जण बरे झाले आहेत. या आकडेवारीवरून उत्तूर परिसरात मोठ्या प्रमाणावर डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

डोळे आल्याने डोळ्यांचा रंग लाल, गुलाबी होत आहे. डोळ्यांची जळजळ होते, खाज सुटते, सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी वाहणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. डोळ्यांच्या साथीबरोबरच सर्दी, ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

काय काळजी घ्यावी

डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपड्याने आपले डोळे पुसू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. घराबाहेर जाताना गॉगलचा वापर करावा. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून काही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार सुरु करावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT