Illegal abortion Case | गर्भातल्या किंकाळ्या कुणी ऐकणार आहे का?  
कोल्हापूर

Illegal abortion Case | गर्भातल्या किंकाळ्या कुणी ऐकणार आहे का?

‘मुलगी म्हणजे ओझं’ या मानसिकतेपोटी पालक, डॉक्‍टर, समाज झाला बहिरा

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : आईच्या उदरात वाढणाऱ्या एका निष्पाप जीवाचा पहिला श्वास घेण्याचाही अधिकार जर पैशाच्या हव्यासाने आणि समाजाच्या विकृत मानसिकतेने हिरावून घेतला जात असेल, तर ती केवळ एका मुलीची हत्या नसते; ती माणुसकीची... संवेदनांची हत्या असते. कोल्हापुरात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजासमोर अस्वस्थ करणारे वास्तव उभे केले आहे. पालक, डॉक्टर आणि समाजच बहिरा झाल्यामुळे गर्भातल्या किंकाळ्या ऐकणार कोण, या भयाण प्रश्नाने भवताल पोखरला आहे.

दोन वर्षांत ३०० स्त्रीगर्भ मारणारा

डॉ. चंद्रकांत गायकवाड गुन्हेगार आहेच; पण गर्भातली मुलगी मारण्यासाठी त्याला हजारो रुपये देणारे पालक, हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारा समाज, कुटुंबव्यवस्थाही दोषी आहे. हा प्रश्न फक्त बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांचा नाही, तर त्या मानसिकतेचा आहे, जी आजही मुलगी म्हणजे ओझे आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानते. जिल्ह्यात ग्रामीण भागात १ हजार मुलांमागे ९६७ मुली, तर शहरात एक हजार मुलांमागे ९४७ मुलींचा जन्म दर आहे. मुलगी झाली म्हणून होणारा छळ, मुलगाच हवा म्हणून मानसिक दबाव, गर्भलिंग जाणून घेण्याचे प्रयत्न आणि त्यातून बेकायदेशीर गर्भपाताचा मार्ग... ही साखळी अजूनही पूर्णपणे तुटलेली नाही. उलट दुर्दैवाने ती घट्ट होत आहे. हजाराच्या पटीत पैसे मिळतात म्हणून कसाई बनलेल्या डॉक्टरांमुळे क्रौर्याच्या कानठळ्या जीवघेण्या ठरत आहेत.

रॅकेट रॉक... प्रशासन शॉक

दरवेळी रॅकेट उघड होते. दिलीप पवार, महेश पाटील, अश्विनी शिंदे, मनीषा कांबळे, युवराज पाटील, श्रीमंत पाटील, स्वप्‍निल पाटील हे ठरावीक आरोपी अटक होतात; पण ठोस पुराव्यांअभावी जामिनावर सुटतात आणि पुन्हा गर्भपाताचे दुकान थाटतात. त्यांच्याकडे ना आरोग्य विभागाचे लक्ष आहे, ना पोलिसांचे. या प्रकरणात ‘रॅकेट रॉक अन् प्रशासन शॉक’ अशी अवस्था आहे.

बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्र चालक, बोगस डॉक्टर, दलाल आणि ग्राहकरूपातील पालक या प्रत्येक घटकामुळे गर्भातल्या मुलींचा जीव धोक्यात येत आहे. कायद्याचा धाक कमी असल्याने पुन:पुन्हा तयार होणाऱ्या साखळीने कोल्हापूर जिल्ह्याला वेटोळा घातला आहे.
गीता हासूरकर, सामाजिक कार्यकर्त्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT