बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलच्या छाप्यात 12.30 लाखांची रोकड व सोनोग््रााफी मशिन जप्त  
कोल्हापूर

Kolhapur Crime : डॉ. युवराज पाटीलसह एजंटला तीन दिवसांची पोलिस कोठडी

बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलच्या छाप्यात 12.30 लाखांची रोकड व सोनोग््रााफी मशिन जप्त

पुढारी वृत्तसेवा

बिद्री : कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व स्त्री भ्रूणहत्येच्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) व पोलिस प्रशासनाने बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा टाकून गर्भलिंग चाचणी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात डॉ. युवराज पाटील (रा. सोनाळी, ता. कागल) आणि त्याचा एजंट संभाजी वसंत शिंदे (45, रा. बोरवडे, ता. कागल) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अप्पर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, एपीआय क्रांती पाटील, एपीआय सागर वाघ यांच्यासह एलसीबी व इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, यापूर्वीही राधानगरी व भुदरगड पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून कागल न्यायालयात खासगी तक्रारही प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमधून आणले पोर्टेबल मशिन

संशयित डॉ. पाटील याने पोर्टेबल सोनोग््रााफी मशिन कर्नाटकमधून आणल्याची कबुली पोलिसांना दिली. मशिन विकणाऱ्यांचा तपास पोलिस करणार आहेत. तसेच गर्भपाताच्या गोळ्या कोणत्या मेडिकलमधून मागविल्या याचीही माहिती घेतली जात आहे.

डॉ. पाटीलची पदवी यापूर्वीच निलंबित

पोलिसांना हॉस्पिटलमध्ये डॉ. उत्तमकुमार बळवंत सरदेसाई यांचे नोंदणीपत्र मिळून आले. डॉ. पाटील व एजंट शिंदे यांच्या घराची झडती रात्री उशिरा घेण्यात आली. यामध्ये डॉ. पाटील याच्यावर यापूर्वीदेखील कारवाई झाली असून त्याची बीएचएमएसची पदवी यापूर्वीच्या कारवाईत निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT