इचलकरंजी : कबनुरात बंदूक हाताळताना सुटलेली गोळी भाड्याच्या घरात सुरू असलेला पिस्टल बनवण्याचा कारखाना उघडकीस आणणारा धागा ठरली. सीएनसी, व्हीएमसी मशिनवर हातखंडा होता. मात्र, विक्रीच्या रॅकेटमधून बक्कळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने तुषार येरुडकर याने साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या धर्तीवर थेट कबनुरात बंदूक बनवण्याचा उद्योग सुरू केला. जिल्ह्यात पहिल्यांदाच बंदूक निर्मितीच्या या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत.
कबनुरात गत आठवड्यात गोळीबाराची घटना घडली. अपघाताचा बनाव उपचारादरम्यान डोक्यात गोळी आढळल्याने फिस्कटला. संशयित तुषार येरुडकर, नीलेश कांबळे, जॉकी माळगे, शुभम सूर्यवंशी हे चौघे मित्र आहेत. येरुडकर याने पिस्टल शुभम सूर्यवंशी याच्याकडे ठेवण्यास दिली होती. चारचाकी वाहनातून जाताना नीलेश कांबळे हा ती हाताळत होता. त्यातून गोळी सुटल्याने तो जखमी झाला. त्या तपासातून पिस्टल बनवण्याचा प्रयत्न उघडकीस आला. गन पावडर, स्टीलचे पार्ट यामुळे देशी कट्टे यापूर्वी बनवल्याचा पोलिसांचा कयास आहे. शहरात यापूर्वी अनेकवेळा परराज्यातून विक्रीसाठी पिस्टलची तस्करी करणारी प्रकरणे उजेडात आली आहेत. मात्र, थेट तस्करीऐवजी कट्टे बनवण्याचा प्रकार गुन्हेगारीची दाहकता आणखी गंभीर झाल्याचे चित्र आहे.
रॅकेटची मोठी व्याप्ती
या प्रकरणातील आणखी एक संशयित मनीष हाबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. येरुडकर याने हाबळेकडूनच बंदूक विकत घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. मात्र, बंदूक निर्मितीचा प्रकार उघडकीस आल्याने यापूर्वी बंदुका तयार करून त्या विकल्या गेल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशिक्षण कुठून घेतले?
व्हीएमसी मशिनवर बंदुकीच्या नेमके कोणते पार्ट तयार केले जात होते, जप्त केलेले स्टीलचे पार्ट आणि पिस्टल बनवण्याचा प्रयत्न किती दिवसांपासून सुरू होता, या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. येरुडकरने पिस्टल बनवणे कुठे शिकला किंवा त्याला कुणी प्रशिक्षण दिले यासह २८ जिवंत काडतुसे, रिकाम्या पुंगळ्या, गन पावडर यांसह अन्य साहित्य त्याला कुणी पुरवले हे उजेडात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.