कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बंडाचे निशाण फडकले. बंडखोरी करत काहींनी मंगळवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात काहींचे शक्तिप्रदर्शनासह तर काहींचे साधेपणाने असे तब्बल 613 अर्ज दाखल झाले असून एकूण दाखल अर्जांची संख्या 818 इतकी झाली. दाखल अर्जांची बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी होणार आहे. शुक्रवार, दि. 2 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार असून त्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
काही झाले तरी महापालिका निवडणूक लढवणारच, असा निश्चय करून गेल्या काही महिन्यांपासून तयारी करणार्या इच्छुकांची धाकधूक अखेरच्या दिवशी मंगळवारीही कायम होती. कोल्हापुरात महाविकास आघाडीने शनिवारी आपल्या काही उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात संधी न मिळालेल्यांनी आपला वेगळा मार्ग धरत उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीने अखेरच्या क्षणापर्यंत यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेताना बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सोमवारीच तिकीट कापल्याची कुणकुण लागलेल्यांपैकी काहींनी अन्य पक्षांत उडी मारली तर काहींनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला.
उमेदवारीसाठी मंगळवारी सकाळपासूनच अनेकांची धावपळ सुरू होती. नेत्यांच्या मनधरणीसह त्यांच्याकडे आग्रह केला जात होता. अखेरच्या क्षणी तरी उमेदवारी आपल्याच मिळेल अशा आशावाद घेऊन काहींनी सकाळी सात-आठ वाजताच नेत्यांचे घर गाठले होते. पक्षासाठी कसे काम केले, आपली पक्षावर कशी निष्ठा होती, कोणत्या जबाबदार्या कशा पार पाडल्या, यापासून आपण कसे सक्षम आहोत, हे पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रभागातील मान्यवर, नेत्यांच्या मर्जीतील लोकांकडूनही फोनाफोनी सुरू होती. मध्यस्थी केली जात होती. जसजसी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळजवळ येत होत होती तसतसा संयम सुटत जात होता. उमेदवारी मिळत नाही हे स्पष्ट होताच अन्य पक्षांशी संपर्क साधत त्यातून आपली उमेदवारी अंतिम करत अनेकांनी अर्ज दाखल केले. सकाळपासून नेतेही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होते. काहींनी विविध कार्यालयांना भेटी दिल्या तर काहींनी निवडणूक अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू केल्या.
भाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी जनसुराज्य शक्तीमधून आपला अर्ज दाखल केला. भाजपचे पदाधिकारी असलेल्या संग्रामसिंह निंबाळकर यांनी आपल्या पत्नीचा अर्ज जनसुराज्य शक्तीमधून भरला. विशाल शिराळकर यांनीही पत्नीचा अर्ज जनसुराज्य शक्तीतून दाखल केला. भाजपचे गणेश देसाई, सरचिटणीस धनश्री तोडकर यांच्यासह रविकिरण गवळी यांनी आपल्या पत्नीचा अर्ज अपक्ष म्हणून भरला. भाजपच्या प्रणोती पाटील यांनी काँग्रेसमधून अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांच्या पत्नीनेही जनसुराज्य शक्ती पक्षातून अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या शारदा संभाजी देवणे यांनी जनसुराज्य शक्तीची साथ धरत अर्ज भरला.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्याच सुपुत्राने बंडखोरी केली. तिकीट न मिळाल्याने त्यांनी जनसुराज्य शक्तीमधून अर्ज दाखल करत महायुतीलाच आव्हान दिले. माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचेही तिकीट कापण्यात आले, त्यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांनी काँग्रेसचा आधार घेत अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीतून अर्ज दाखल केला.
काँग्रेसचे माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे सुपुत्र अक्षय जरग यांनी जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा कवाळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या माजी नगरसेविका पद्मजा भुर्के यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षातून अर्ज दाखल केला. महायुतीने उमेदवारांची यादी मंगळवारी दुपारपर्यंत जाहीरच केली नाही. मात्र, ज्यांना उमेदवारी दिली त्यांतील काहींना रात्रीच तर काहींना आज सकाळी एबी फॉर्म दिले. एबी फॉर्म मिळाल्याने सुरू असलेली धाकधूकीची जागा जल्लोषाने घेतली. उत्साही वातावरणात, नेत्यांचे आशीर्वाद घेत, अनेकांनी मिरवणुकीने जात उमेदवारी अर्ज दाखल केले.
इचलकरंजी महापालिकेत महायुती, शिवशाहूसह तिसरी आघाडी रिंगणात
इचलकरंजी महापालिकेसाठी अखेरच्या दिवशी चुरशीने 391 उमेदवारी अर्ज दाखल झाले. इचलकरंजीच्या 65 जागांसाठी एकूण 456 अर्ज दाखल झाले आहेत. महायुती आणि शिवशाहू आघाडी यांच्यासह तिसर्या आघाडीचे उमेदवारही रिंगणात उभे ठाकले आहेत. मात्र इचलकरंजीतही बंडखोरीचे ग्रहण लागले असून माघारीनंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
आज छाननी; शुक्रवारी माघार
दाखल अर्जांची बुधवारी (दि. 31) छाननी होणार आहे. या छाननीसाठी उमेदवारांनी जय्यत तयारी केली आहे. काहींनी तर वकिलांची फौजच उभी केली आहे. यासह प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर कोणता आक्षेप घेता येईल, याबाबतही चाचपणी सुरू होती. सकाळी 11 वाजता छाननीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शुक्रवार, दि.2 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे.
बंडखोरांना समजवणार कसे?
सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्याचाच चंग असल्याने काहींनी थेट अन्य पक्षातून उमेदवारी घेतली. यामुळे त्यांच्या माघारीचा प्रश्नच नाही. मात्र, काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले, त्या बंडखोरांना समजवणार कसे, असाही प्रश्न नेत्यांपुढे आहे. काहीजणांनी बंडखोरी केली नसली तरी त्यांची शांतताही धोकादायक ठरू शकते. त्यांची समजूत काढण्याचेही आव्हान आहे.