कोल्हापूर/मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर, इचलकरंजीसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी गुरुवारी (दि. 22) मुंबईत आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांसह महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण जाहीर होताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिकेत महायुतीची मजबूत स्थिती असल्याने इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
कोल्हापूर महापालिकेत सर्वाधिक जागा घेऊन काँग्रेस पक्ष आघाडीवर असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची एक जागा असल्याने महाविकास आघाडीची एकूण संख्या 35 झाली आहे. दुसरीकडे, महायुतीकडे एकूण 45 जागा असून, त्यामध्ये भाजप 26, शिवसेना (शिंदे गट) 15 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 जागांचा समावेश आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत महापौरपद महायुतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर महापौरपदासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. यंदा पहिल्यांदाच राज्यातील तब्बल 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी एकत्रित आरक्षण सोडत काढली जात आहे. नगरविकास मंत्रालय, मुंबई (सहावा मजला) येथे सकाळी 11 वाजता ही सोडत होणार आहे. या सोडतीत कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यभरात महापौर निवडीत शह-काटशहचे राजकारण रंगताना दिसत असून, काही ठिकाणी महायुतीत, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद उफाळून येत असल्याचे चित्र आहे. यामुळे विरोधकांशी हातमिळवणी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर महापालिकेतही राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम होण्याचा अंदाज असून, सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. आज होणार्या आरक्षण सोडतीनंतर महापौरपदाचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून, त्यानंतर इच्छुकांकडून लॉबिंग आणि राजकीय हालचाली आणखी तीव— होण्याची शक्यता आहे.
वस्त्रनगरीत उत्सुकता शिगेला
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या महापौरपदासाठीच्या गुरुवारी होणार्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडत कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होणार, याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली असून, भाजप-महायुतीला सत्तेचा मतदारांनी कौल दिला आहे. महापौर निवडीनंतर सत्ता स्थापनेला वेग येणार आहे.