कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 17) दुपारी तीन वाजता कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रश्नावर भविष्यातील सर्व आंदोलने महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मरगाळे म्हणाले, गेली 69 वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनानंतर या प्रश्नासंदर्भात फारशी हालचाल दिसून येत नाही. अशातच हा भाग केंद्रशासित करावा, असा पर्याय काही लोकप्रतिनिधी सुचवत आहेत. मात्र, आम्हाला पर्याय नको. कोर्टातून निर्णय घ्यायचा आहे. पूर्वी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. मात्र, तोडगा निघाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चंद्रचूड समिती नेमली. या समितीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शिफारस केली. या शिफारशीप्रमाणे आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
अनेक वर्षांत सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकचे मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, मुख्य सचिव न्यायालयात उपस्थित राहून वकिलांमार्फत पाठपुरावा करीत आहेत. याउलट महाराष्ट्र सरकारने फारसा पाठपुरावा केला नाही. आपले लोकप्रतिनिधी न्यायालयात उपस्थित राहत नसल्याने वकिलांवर दबाव येत नाही. केवळ वकील नेमले म्हणजे काम होत नाही. वकिलांशी सातत्याने संवाद साधून चर्चा केली पाहिजे, असे मरगाळे यांनी सांगितले.
मरगाळे म्हणाले, या प्रश्नावर कर्नाटकात आंदोलन करताना विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. यामुळे तरुण मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे; तर महाराष्ट्र सरकार या प्रश्नाकडे फारसे लक्ष देत नसल्याने यापुढे सर्व आंदोलने महाराष्ट्रात करण्यात येणार आहेत. याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाने करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस माजी आ. मनोहर किणेकर, एम. जे. पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करून कोल्हापुरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कर्नाटकातून सुमारे 300 ते 400 कार्यक र्ते सहभागी होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्प्याने सांगली, सातारा येथे आंदोलन करून 1 मे रोजी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातून सुरू होणार्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.