सरूड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील पश्चिमोत्तर डोंगराळ भागात रानडुक्कर आणि गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोतोली, कर्नाळवाडी येथील सुमारे २० एकर ऊस तसेच भात शेती उध्वस्त झाल्याने संपत ज्ञानदेव पाटील, तुकाराम दगडू पाटील तसेच बळवंत कर्नाळे आदींसह संबंधित शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान या भागातील शेतात रानडुक्कर, गव्यांकडून सातत्याने घुसखोरी होत असते. घोलमडून नुकसान होणारा ऊस ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये भरून शेतातून बाहेर काढवा लागत आहे. आलतूर, पुसार्ळे, रेठरे या गावातील शेतकऱ्यांना देखील जंगली श्वापदांचा उपद्रव असह्य झाला आहे. शेतकऱ्यांच्या गावठी प्रतिबंधक उपायांना ही जंगली श्वापदे दाद देत नाहीत. यामुळे शासनाच्या तुटपुंज्या पीक नुकसान भरपाईचा विचार करता 'भरपाई नको मात्र जंगली प्राण्यांना आवरा' अशी शासनाला आर्जव करणारे त्रस्त शेतकरी शेती पिकवायची सोडून द्यायच्या विचारात असल्याची अगतिकता कोतोली येथील संपत ज्ञानदेव पाटील या पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्याने दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केली.