Former CJI Bhushan Gawai 
कोल्हापूर

Kolhapur Bench : कोल्हापूर खंडपीठ ही काळ्या दगडावरील रेष; त्याला कोणीही रोखू शकणार नाही

खंडपीठाची पूर्तता लवकरच : माजी सरन्यायाधीश भूषण गवई; सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाल्याने सहा जिल्ह्यांतील नागरिक, वकील, पक्षकार यांचे ४० वर्षांच्या संघर्षानंतर स्वप्न साकार झाले आहे. कोल्हापूरला खंडपीठ होणे ही काळ्या दगडावरील रेष आहे. त्याला कोणीही रोखू शकणार नाही, लवकरच कोल्हापूरचे खंडपीठ पूर्णत्वास जाईल, असा विश्वास भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित खंडपीठासाठी मागणी केलेल्या अतिरिक्त ५२ एकर जागेसह एकूण ७५ एकर क्षेत्राचा सातबारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि सर्किट बेंचच्या वरिष्ठ न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

डॉ. जाधव यांच्याशी चर्चेत गवई यांनी व्यक्त केला होता विश्वास

कोल्हापूरला खंडपीठ होणे ही काळ्या दगडावरील रेष आहे, ते होणारच, असा ठाम विश्वास भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना व्यक्त केला होता. गुरुवारी (दि.१३) गवई यांनी डॉ. जाधव यांना फोन करून विचारपूस केली. त्यावेळी खंडपीठाबाबत डॉ. जाधव यांनी विचारताच ‘कोल्हापूरला खंडपीठ होणे ही काळ्या दगडावरील रेष आहे, ते होणारच’ असा विश्वास गवई यांनी व्यक्त केला होता. रविवारी कोल्हापुरात झालेल्या वर्षपूर्ती कार्यक्रमातही गवई यांनी ठामपणे तेच वाक्य उच्चारत खंडपीठाबाबतचा विश्वास पुन्हा व्यक्त केला.

आपल्या पाठपुराव्याने जागेची पूर्तता झाली : प्रधान सचिव खारगे यांचा डॉ. जाधव यांना फोन

राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी रविवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना फोन करून आपल्या पाठपुराव्यामुळे खंडपीठासाठी ७५ एकर जागेची पूर्तता झाल्याचे सांगितले. खंडपीठासाठी जागा मिळावी याकरिता सर्किट बेंच उद्‌घाटनापूर्वी आपण गतीने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही पाठपुरावा केला. यामुळे सर्किट बेंच उद्‌घाटनादिवशी खंडपीठासाठी २३ एकर जागा देता आली. त्याच पद्धतीने आम्ही उर्वरित ५२ एकर जागेसाठी काम केले. त्यावर डॉ. जाधव यांनी आपण कोल्हापूरचे सुपुत्र आहात. आपण आपुलकीने हे काम केले. त्याचे श्रेय तुम्हालाच असल्याचे खारगे यांना सांगितले.

कोल्हापूरला विभागीय आयुक्त कार्यालय व्हावे

खंडपीठास जागा देण्याचा निर्णय तातडीने घेतल्याबद्दल माजी सरन्यायाधीश गवई यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले. त्यांनी मनात आणले नसते तर विलंब झाला असता. खंडपीठ प्रश्न लवकरच मार्गी लागेल. परंतु, अद्याप काही अडचणी असल्याने वकिलांना पुणे, मुंबईत जावे लागते. यासाठी कोल्हापूरला विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना न्या. गवई यांनी आबिटकर यांना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT