विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे लघु पाझर तलाव आज (५ जुलै २०२६) सकाळी ८.१५ वाजता २.९९ द.ल.घ.मी. इतक्या आपल्या पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव पूर्ण भरला असून, प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
तलाव पूर्ण भरल्यामुळे स्थानिक ओढे आणि पर्यायाने कडवी नदीच्या पात्रातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) नदीकाठच्या सर्व गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पर्यटकांना धरण क्षेत्रात प्रवेशबंदी
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक धरण परिसरात गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र, सुरक्षेचे कारण लक्षात घेता सदर धरण क्षेत्र हे निषिद्ध क्षेत्र घोषित करण्यात आले असून, पर्यटकांना येथे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी पात्राजवळ जाणे टाळावे, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.