कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५४ मि.मी., तर १७ धरण क्षेत्रांत एकूण १,१४० मि.मी. पाऊस कोसळला. परिणामी, नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार (दि. ६) पर्यंत पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे.
गेल्या २४ तासांत ‘राधानगरी’सह १० धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत साडेतीन फुटांची वाढ होऊन रात्री १२ वाजता पातळी १७.४ फुटांवर होती. धुवाँधार पावसामुळे शुक्रवारी करूळ घाटात दरड कोसळली. गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचल्याने गडहिंग्लजमार्गे चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरामार्गे वळवली आहे. तर, चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण ९१ टक्के भरल्याने जलविद्युत केंद्रातून ४५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी गुरुवारी रात्री ११ वाजता १३ फूट ६ इंचांवर होती. यामध्ये तीन फूट ८ इंचांची वाढ होऊन शुक्रवारी रात्री १२ वाजता पातळी १७.४ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, शिरोळ, यवलूज, कोगे हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
जिल्ह्यातील १२ तालुक्यांत गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५४ मि.मी. पाऊस झाला आहे. गगनबावडा येथे अतिवृष्टी झाली आहे. त्यानंतर पन्हाळा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. १७ धरण क्षेत्रांत एकूण १,१४० मि.मी. पाऊस झाला. यामध्ये राधानगरी, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चित्री, जांबरे, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे.
जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’ पथक दाखल
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून नद्यांच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. ३० जवानांचा समावेश असलेले, मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्रीने सुसज्ज असे ‘एनडीआरएफ’चे २५ जवानांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाकडून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली असून शनिवारपासून विविध ठिकाणी पथकांकडून पाहणीही केली जाणार आहे. यासह विविध भागांत जनजागृतीही केली जाणार आहे.