कोल्हापूर : कोल्हापुरात उन्हाचा तडाखा कायम आहे. गुरुवारी कमाल तापमानात काहीशी घसरण होऊन पारा 38.1 अंशांवर स्थिरावला होता. मात्र, सापेक्ष आर्द्रता 76 टक्क्यांपर्यंत वाढल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा कमाल तापमान दोन अंश अधिक भासत होते. यामुळे कोल्हापूरकर घामाघूम झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी तापमान पुन्हा वाढण्याचा अंदाज असून दुपारनंतर ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शहरात दुपारी कमालीचा उकाडा जाणवत होता. उकाड्यामुळे नागरिक आता हैराण झाले होते. उन्हाची तीव्रता इतकी आहे की, काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळू लागले आहे. एप्रिल महिन्यात तापमान 37 ते 40 अंशांच्या घरात कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
एप्रिल अखेरपर्यंत कोल्हापुरातील कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यानच राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही अंशांची घट होण्याचा अंदाज असून एप्रिलच्या तुलनेत उष्णतेची तीव्रता थोडी कमी होऊ शकते. हीटवेव्ह घोषित करण्यासाठी तापमान किमान 41.5 अंशांपर्यंत जाणे आवश्यक असते.-अथ्रेय शेट्टी, हवामान तज्ज्ञ, मुंबई
* आज पुन्हा हलक्या पावसाची शक्यता
* एप्रिलमध्ये तापमान 37 ते 40 दरम्यानच राहणार
* 19 एप्रिलपासून प्री-मान्सून वादळी पावसाची चौथी लाट सक्रिय होण्याची शक्यता
* सापेक्ष आर्द्रता 76 टक्क्यांपर्यंत गेल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा 2 अंश अधिक उकाडा जाणवतो