Kolhapur Accident News 
कोल्हापूर

Kolhapur Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे ठार, दोघे गंभीर

कागल तालुक्यातील बामणी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील बामणी येथे दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अविनाश झेंडे (रा. साळशी, ता. शाहूवाडी) आणि अविनाश भीमराव पाटील (वय ३२, रा.कोगील, ता. करवीर) अशी मृत तरूणांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश झेंडे हे आपल्या कामानिमित्त मुरगुडकडून साळशीकडे परतत होते. त्यांच्या दुचाकीवर मागे सूरज पाटील (वय २३) हा तरुण बसला होता. दरम्यान, कोगील येथील अविनाश पाटील हे शहाजी परीट यांना सोबत घेऊन खेबवडेच्या दिशेने जात होते. बामणी परिसरात या दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. यामध्ये अविनाश झेंडे व अविनाश पाटील या दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज पाटील आणि शहाजी परीट हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले. सुरज पाटील याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर शहाजी परीट यांच्यावर कणेरी मठ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते. या घटनेमुळे साळशी आणि कोगील परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT