कोल्हापूर

Kolhapur: गुडाळ-कसबा तारळे परिसरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान

गुडाळ आणि कसबा तारळे परिसरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ : गुडाळ आणि कसबा तारळे परिसरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे व कौले उडून गेली असून अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.

कसबा तारळे येथील आठवडा बाजारात मुसळधार पावसामुळे विक्रेत्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागल्याने विक्रेत्यांचा माल व साहित्य वाहून जाण्याच्या घटना घडल्या.

गुडाळवाडी येथील रामचंद्र श्रीपती मोहिते यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील पत्र्याचे छत लोखंडी अँगलसह उडून शेतात पडले. या घटनेत त्यांचे सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले. तसेच सुरेश कृष्णा सुतार यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेल्याने त्यांचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

कसबा तारळे येथेही वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. दिनकर बावडेकर, गणपती बावडेकर, उमेश बावडेकर आणि शामराव सायेकर यांच्या घरांवरील पत्रे व छते उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. बावडेकर यांच्या घरावरील अँगल व पत्रे इतर घरांवर तसेच तालुका संघाच्या शाखेवर पडल्याने अतिरिक्त नुकसान झाले.

दरम्यान, गुडाळवाडी येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या सुरेश सुतार, रामचंद्र मोहिते, अरुण वागरे, उमेश भोई, रणजीत भोई, उत्तम हुजरे आणि विनायक मोहिते यांच्या घरांत पावसाचे तुंबलेले पाणी शिरले. लोकनियुक्त सरपंच विमल पाटील, उपसरपंच हकीम बलवंड, गुरुनाथ पाटील, संदीप पाटील, धनाजी गुरव आणि याकुब बक्षु यांनी नुकसानग्रस्त घरांना भेटी दिल्या. त्यांच्या उपस्थितीत तलाठी निलेश पाटील आणि एकनाथ कांबळे यांनी नुकसानीचे पंचनामे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT