Kolhapur GST collection | कोल्हापूर परिक्षेत्रात जीएसटीची 9,290 कोटी रु. भर 
कोल्हापूर

Kolhapur GST collection | कोल्हापूर परिक्षेत्रात जीएसटीची 9,290 कोटी रु. भर

’आयजीएसटी’मध्ये संमिश्र कल, तर ’सेस’मध्ये मोठी घसरण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपलेल्या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कर विभागाने एकूण 9,290 कोटी 13 लाख रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 5.53 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी विविध करांच्या आकडेवारीवरून विभागातील व्यावसायिक क्षेत्राचे बदलते प्रतिबिंब उमटले आहे.

‘कोल्हापूर वेस्ट’ची आयजीएसटीत बाजी

आंतरराज्य व्यापाराचे निदर्शक असलेल्या ‘आयजीएसटी’मध्ये कोल्हापूर वेस्ट परिमंडळाने (पश्चिम कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) 22.29 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली आहे. याउलट कोल्हापूर ईस्ट (8.05 टक्के), सोलापूर (5.80 टक्के) आणि सातारा (0.62 टक्के) या भागात आयजीएसटीमध्ये घट झाली आहे. कोकण पट्ट्यात बाहेरील राज्यांतून होणारी मालाची आवक आणि पर्यटनामुळे वाढलेला उपभोग यामुळेच कोल्हापूर वेस्टने ही आघाडी घेतल्याचे स्पष्ट होते. जीएसटी विभागातून ही माहिती देण्यात आली.

सेसमधील घसरण काय सुचवते?

विभागात सर्वाधिक धक्कादायक आकडेवारी ‘सेस’ संकलनाची आहे. संपूर्ण विभागात सेसमध्ये 11.40 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. कोल्हापूर ईस्टमध्ये ही घट तब्बल 26.80 टक्के आहे. सेस प्रामुख्याने सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, आलिशान गाड्या आणि कोळसा यांसारख्या वस्तूंवर लावला जातो. यातील मोठी घट म्हणजे एक तर या वस्तूंच्या वापरात घट झाली आहे किंवा स्थानिक बाजारपेठेत या वस्तूंची मागणी मंदावली आहे. विभागाच्या व्यावसायिक स्थितीची आकडेवारी पाहता कोल्हापूर विभाग आता केवळ उत्पादन केंद्र न राहता एक मोठे ‘कंझम्प्शन हब’ (उपभोग केंद्र) बनत आहे. कोल्हापूर वेस्टमधील आयजीएसटीची वाढ हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्रशासकीय कर अंमलबजावणी आणि व्यापार-उद्योगांच्या प्रतिसादामुळे विभागाने 5.53 टक्क्यांची ओव्हरऑल ग्रोथ साध्य केली असली, तरी सोलापूरमधील मरगळ दूर करण्याचे आव्हान विभागासमोर असेल.

स्थानिक व्यापारात ‘कोल्हापूर ईस्ट’चा दबदबा

स्थानिक व्यापार आणि उत्पादनावर आधारित असलेल्या सीजीएसटी (CGST) आणि एसजीएसटीमध्ये (SGST) कोल्हापूर ईस्टने (पूर्व कोल्हापूर आणि सांगली) उत्तम कामगिरी केली आहे. येथे सीजीएसटीमध्ये 12.63 टक्के, तर एसजीएसटीमध्ये 13.70 टक्के वाढ झाली आहे. सातार्‍यानेही या दोन्ही करांत अनुक्रमे 8.83 आणि 6.02 टक्के वाढ नोंदवत आपली स्थिरता टिकवली आहे; मात्र सोलापूर परिमंडळात सर्वच आघाड्यांवर घट दिसून आली असून, तेथील औद्योगिक मंदी चिंतेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT