Sugarcane Workers 
कोल्हापूर

Kolhapur Sugarcane Workers : उसाच्या फडात मातृत्वाची अग्‍निपरीक्षा; ११० गर्भवतींच्या वाट्याला संघर्ष

पोटात बाळ, डोक्यावर ऊन, कडाक्याची थंडी अन् डोळ्यांत भविष्‍याची चिंता... ऊसतोड मजुरांचे विदारक चित्र

पुढारी वृत्तसेवा

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : पोटात वाढणारा नवा जीव... तर दुसऱ्या बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेला उसाच्या फडातील संघर्ष! डोक्यावर छप्पर नाही, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय नाही. पहाटेच्या काळोखातच आंघोळ उरकायची, नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जायचे, दिवसभर कडाक्याचे ऊन, सकाळी, संध्‍याकाळी कडाक्याची थंडी झेलत पालावर आणि उसाच्या फडात राबायचे... ही कथा कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या झोपडीमधील ११० गर्भवतींची आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांतून शेकडो कुटुंबे ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील २४ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात आली आहेत. या कुटुंबांसोबत आलेल्या महिलांपैकी ११० गर्भवती असल्याचे शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. गर्भवतींच्या पोटात एक नवा जीव आकार घेत आहे; मात्र त्या जीवाला जन्म देण्यापूर्वीच या महिलांना जगण्याची लढाई आणि मातृत्वाची अग्‍निपरीक्षा द्यावी लागत आहे.

गर्भवती महिलांसाठी विश्रांती, सकस आहार, नियमित तपासणी आणि सुरक्षित वातावरण महत्त्वाचे असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असते. मात्र या महिलांच्या नशिबी यापैकी किती गोष्टी आहेत, हा प्रश्नच अस्वस्थ करणारा आहे. दिवस उजाडण्यापूर्वीच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. पालाच्या आडोशाला आंघोळ उरकताना गोपनीयतेचा प्रश्न, नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागण्याची वेळ आणि रात्रीच्या अंधारात सुरक्षेची चिंता... अशा एक ना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आहे.

गर्भात बाळ, डोक्यावर कर्जाचे ओझे!

अनेक मजूर मजुरीचे ॲडव्हान्स आणि कर्ज घेतात. हातावर पोट असलेल्या संसाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. काम थांबले तर मजुरीवर परिणाम होतो. मजुरीवर परिणाम झाला तर कर्ज फेडण्याचे गणित बिघडते. म्हणून गर्भवती पतीसोबत ऊस तोडणी, भरणीचे काम करताना दिसतात.

गेल्या वर्षी ८२, यंदा ११० गर्भवती

दुष्‍काळामुळे गत हंगामाच्या तुलनेत यंदा ऊसतोड मजुरांमधील गर्भवती महिलांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी ८२ गर्भवती महिला होत्या. यंदा हा आकडा ११० वर पोहोचला आहे. शासनाची आरोग्य यंत्रणा या महिलांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्याकडून आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा देण्याचे प्रयत्न होत आहेत.

लेकराबाळासह आम्ही आलो आहोत. आमच्या टोळ्यांत गर्भवती महिला, लहान मुले आहेत. तात्पुरत्या झोपडीत राहात असल्याने अंधारात महिलांना आंघोळ करावी लागते. नैसर्गिक विधीही उघड्यावरच करावा लागतो. पण पोटासाठी कुटुंबासह ऊसतोडणीचे काम करावेच लागते.
- चंद्रकांत मस्के, ऊसतोडणी मजूर, पारगाव, पहाडी, जि. बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT