कोल्हापूर : जिल्ह्यातील २०२४ ते २०२६ अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या ४५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका आता थेट पुढील वर्षीच होतील, अशीही शक्यता आहे. यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना आता आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत २२ ग्रामपंचायतींची मुदत संपली. यानंतर जानेवारी ते डिसेंबर २०२५ यावर्षी ३ ग्रामपंचायतींची मुदत संपली. जानेवारी ते डिसेंबर २०२६ यावर्षी तब्बल ४३३ ग्रामपंचायतींच्या मुदत संपत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकराज सुरू आहे.
राज्यात सध्या मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या ‘एसआयआर’ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्याची मतदारयादी नव्याने प्रकाशित केली जाणार आहे. या मतदारयादीचा वापर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी केला जाणार आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ मिळाली असून, आता ती ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर तिचा वापर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी केला जाणार असल्याने या निवडणुका २०२७ मध्येच होतील याची दाट शक्यता आहे.
राज्यात आरक्षण मर्यादेवरून २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. यामुळे या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता आहे. या निवडणुकांसाठी लागणारी ‘ईव्हीएम’ची संख्या विचारात घेता, जि.प. आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे अगोदर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतरच ग्रामपंचायतींचा धुरळा उडेल, असेही सांगण्यात येत आहे.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबतही दुष्काळच्या कारणास्तव साशंकता व्यक्त केली जात आहे. एकूणच या सर्व परिस्थितींचा विचार करता ग्रामंपचायत निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता जवळपास मावळली असून, या सर्व निवडणुका पुढील वर्षीच होतील, याची दाट शक्यता आहे.
१०० ग्रामपंचायतींत रिक्त जागा
सार्वत्रिक निवडणुकीसह तब्बल १०० ग्रामपंचायतींत सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त जागा आहेत. थेट सरपंचपदाच्या ४० जागा रिक्त आहेत. सदस्यांच्या ८९ जागा रिक्त आहेत. यासाठीही निवडणूक होणार आहे.