Gokul Debenture Refund Demand:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'ने डी-बेंचरपोटी दूध उत्पादक आणि दूध संकलक संस्थांच्या कापून घेतलेल्या रकमेबद्दल कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे, ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध उत्पादकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (गुरुवार, १६ ऑक्टोबर) दूध उत्पादकांनी 'गोकुळ'च्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
आज सकाळी सर्किट हाऊस येथून या मोर्च्याला सुरुवात झाली. दूध उत्पादक आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क गायी आणि म्हशींना सोबत घेऊन 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयावर धडकले. या आंदोलनात मोठ्या संख्येने दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आणि सभासद सहभागी होणार आहेत. या मोर्चाचं नेतृत्व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक करणार आहेत.
मोर्चाचे आयोजन करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन 'गोकुळ' संस्थेच्या विरोधात नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. "जी रक्कम डी-बेंचरपोटी कापून घेण्यात आली आहे, ती तातडीने दूध उत्पादकांना आणि संस्थांना परत मिळावी, अन्यथा दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करण्यात यावी," अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन 'गोकुळ' प्रशासनाला देण्यात येणार आहे.
या मोर्च्यामुळे 'गोकुळ' प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता असून, दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.