Navid Mushrif Viral Post on iPhone
कोल्हापूर : आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होत असतात. मात्र, यातील काही पोस्ट्स समाजाला नक्कीच विचार करायला भाग पाडतात. नुकताच आयफोन १७ बाजारात दाखल झाला आहे. हा फोन घेण्यासाठी तरुणाईच्या उड्या पडू लागल्या आहेत. यावरून गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून ती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
मुश्रीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खरं इन्व्हेस्टमेंट तेच, जे आपल्याला भविष्यात उत्पन्न देतं. लाखो रुपयांचे आयफोन खरेदी करण्यापेक्षा लाख रुपयांची म्हैस किंवा गाय विकत घेतली, तर ती आपल्याला कायमस्वरूपी उत्पन्न देऊ शकते.”
मुश्रीफ यांच्या पोस्टमधून तरुण पिढीला पैशाचा योग्य वापर कसा करावा, याचा संदेश देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक तरुण महागड्या गॅजेट्सच्या मागे धावतात. तसेच सतत नवीन गॅजेट्स बदलताना दिसतात. मात्र, ही डिजिटल साधने वेळोवेळी अपग्रेड करावी लागतात आणि त्यांची किंमतही कमी होत जाते. उलट शेती, दूध व्यवसाय किंवा पशुपालन यामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात नियमित उत्पन्नाचा आधार ठरू शकते, हे मुश्रीफ यांच्या पोस्टमधून अधोरेखित होते.
ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे. काहींनी याला “ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा विचार” असे म्हटले आहे, तर काहींनी “तरुणांना दिशादर्शक संदेश” असेही संबोधले आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन आणि पशुपालन यामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विचारांना स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.