कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयात दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि.१०) तिसर्या दिवशी ९ संस्थांनी ठराव सादर केले. आजअखेर एकूण ११ संस्थांनी ठराव दाखल केले आहेत.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ५,४७० पैकी अवसायन प्रक्रियेतील दूध संस्था वगळता अन्य दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २ जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत आहे. सोमवारपासून (दि.८) दूध संस्थांकडून ठराव येण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील सरस्वती, तर मंगळवारी गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथील सतीश दूध संस्थेचा ठराव दाखल झाला. बुधवारी (दि.१०) गडहिंग्लज ३, हातकणंगले २, राधानगरी २ आणि आजरा व करवीर तालुक्यातून प्रत्येकी १ असे एकूण ९ दूध संस्थांचे ठराव सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
निकाल पत्र पाठविण्यास सुरुवात
अवसायन प्रक्रियेतील १,३२० दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुनावणी झालेल्या संस्थांना सहायक निबंधक कार्यालयाकडून निकालपत्र पाठविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने संस्थांना निकाल पत्र पाठविले जाणार आहे.