Gokul Election | सर्वसाधारण गटाच्‍या २० जागांसाठी १४६ अर्ज वैध  
कोल्हापूर

Gokul Election : ‘गोकुळ’चा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; ‘वर्षा’वर आज महायुतीच्या नेत्यांची बैठक

कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचला आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेला मतभेद आणि त्यातून झालेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (दि. ३०) मुंबईतील वर्षा निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरतो का आणि स्थानिक पातळीवरील धुसफूस थांबते का, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘गोकुळ’ निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याची भूमिका भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य घटक पक्षांकडून मांडली जात असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून अंतर्गत स्पर्धा कायम आहे. ठरावांच्या संख्याबळानुसार जागावाटप करण्याची भूमिका यापूर्वी मांडण्यात आली होती. मात्र, पक्षनिहाय जागावाटपाचा फॉर्म्युलाही चर्चेत आल्याने महायुतीतील समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत या मतभेदांचे पडसाद उमटले. मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत जागावाटपावरून चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कार्यकर्ते आणि नेत्यांमध्येही मतभेद उफाळून आल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तोडगा निघण्याऐवजी हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर गेला आहे. त्यामुळे जागावाटपानंतरही तिढा सुटला नाही, तर माघारीला नेत्यांची दमछाक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT