कोल्हापूर :‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. नंतर हरकती व हरकतींवर सुनावणी असा एकूण २४ दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. ४ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
गोकुळची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाची ही मुदत ६ ऑगस्टला संपली. तरीही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न झाल्याने हसूर (ता. करवीर) येथील दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारनेही मुदतवाढीसाठी अर्ज केला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ६० दिवसांत निवडणूक पूर्ण करण्याचे आदेश दिले. या आदेशाची गंभीर दखल घेत विभागीय उपनिबंधक यादी प्रसिद्ध करणार आहेत.
प्रारूप मतदार यादी गोकुळसह सहायक निबंधक कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल. यादीवर १२ ते २१ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक निबंधक कार्यालयात हरकती सादर करता येणार आहेत. ३१ ऑगस्ट सायंकाळी ५ पर्यंत प्राप्त हरकतींवर निर्णय घेण्यासाठीची मुदत असेल. यानंतर ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर आठवडाभराच्या कालावधीनंतर गोकुळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.