कोल्हापूर : ‘गोकुळ’ संलग्न सुमारे 1,200 दूध संस्था अवसायनात काढण्याच्या प्रक्रियेला दिलेल्या स्थगितीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य शासनाला दिला. तसेच, यासंदर्भातील पुढील सुनावणी 25 मार्च रोजी ठेवली आहे. न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’शी संलग्न असणाऱ्या 1,108 दूध संस्था अवसायनात काढण्यासंदर्भात सहायक निबंधक दुग्ध यांनी नोटीस बजावली होती. या प्रक्रियेला तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून स्थगिती आणली होती. या स्थगितीसंदर्भात वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी (दि. 18) सुनावणी झाली. सुनावणीमध्ये न्यायालयाने दूध संस्था अवसायनात काढण्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रक्रियेला दिलेल्या स्थगितीसंदर्भात राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.