कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकपदासाठी बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी शिवाजीराव आडनाईक (यवलूज), सनदी लेखापाल के. डी. पाटील (केनवडे), डॉ. प्रवीण हेंद्रे (कोल्हापूर) आणि ॲड. प्रकाश पाटोळे (सांगली) या चार नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. या चार नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त असून, सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांचेही नाव शासकीय संचालक म्हणून निश्चित झाल्याची चर्चा आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल.
गोकुळमधील शासन नियुक्त्यांवरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच महायुतीने राजकीय नियुक्त्यांऐवजी सहकार, बँकिंग, लेखा आणि कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी देण्याची रणनीती आखल्याचे समजते. शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाला जिल्ह्यातून तसेच प. महाराष्ट्रातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीने हा पर्यायी मार्ग शोधल्याची चर्चा आहे. अध्यादेशाला न्यायालयीन प्रक्रियेत आव्हान मिळण्याची शक्यता लक्षात घेता तूर्तास राजकीय व्यक्तींना संधी देण्याचे टाळून बिगरराजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करण्याचा विचार पुढे आल्याचे सांगितले जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारासह चार शासन नियुक्त संचालक नेमण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या निर्णयाचे अध्यादेशात रूपांतर झाले. मात्र, या निर्णयामुळे गोकुळच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, शनिवारी चर्चेत असलेल्या नावांबाबत अधिकृत घोषणा झालेली नसल्याने अंतिम नियुक्त्या कोणाच्या होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय नावे बदलली
शासन नियुक्तसाठी यापूर्वी गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे आणि अशोक फराकटे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शासनाचा शासन नियुक्त संचालकांचा निर्णय न्यायालयीन पातळीवर टिकेल का नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे राजकीय नावे बदलली असल्याची चर्चा आहे.