कोल्हापूर : संचालक मंडळ अस्तिवात नसताना गोकुळच्या पैशातून संचालक सर्वोच्च न्यायालयात गेल्याचा गंभीर आरोप तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच महिनाभरात मंजूर केलेल्या निविदांचीही चौकशी करण्याची मागणी प्रशासक मंडळाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेलवाडे यांनी मंगळवारी दुपारी गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुनीलकुमार सुद्रीक यांचे स्वागत केले. यानंतर येथील गेटवर ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करून भष्टाचाराला थारा नसल्याचे दाखवून दिले. घराणेशाही, हुकूमशाही मोडीत निघाल्याने पारदर्शक व भष्टाचारमुक्त कारभाराची नांदी सुरू झाल्याचे बेलवाडे यांनी सांगितले. तसेच प्रशासक मंडळ चौकशीसाठी आलो नाही असे सांगते. मात्र आमच्या काही मागण्या, तक्रारी आहेत, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली.
दोघांचाच कारभार, 20 जणांना किंमतच नाही
गोकुळमध्ये ठरावीक लोकच नेतृत्व करत होते. 18 ते 20 संचालकांना किंमतच नव्हती. दोन कारभारी म्हणतील तसेच काम व्हायचे. प्रशासकामुळे कारभाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघाल्याचे बेलवाडे यांनी सांगितले.
बोगस संस्था रद्द करणे हाच उद्देश
2021 नंतर बोगस दूध संस्थांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या संस्थांचा वापर मतदानासाठी करत काहींना गोकुळची मलई खायची आहे. बोगस संस्थांमुळे प्रामाणिक दूध संस्थांवर अन्याय होत होता. त्यामुळे दूध संस्थांनी गैरसमज करून घेऊ नये, बोगस संस्था रद्द करणे हाच उद्देश असल्याचे बेलवाडे यांनी स्पष्ट केले.