Kolhapur Gokul Election  AI
कोल्हापूर

Gokul Election | गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना दिलासा; अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचा निकाल; पात्र ठरलेल्या संस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court Verdict 492 Milk Societies

आशिष ल. पाटील

गुडाळ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धामधूम सुरू असतानाच अवसायनातून पात्र ठरलेल्या ४९२ दूध संस्थांना पुन्हा अपात्र ठरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज फेटाळण्यात आली. त्यामुळे या ४९२ संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेतील न्यायालयीन वादाला आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

या निकालाकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. सहाय्यक निबंधक (दुग्ध), कोल्हापूर यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी १९४ दूध संस्था उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने पात्र ठरवल्या होत्या. तर अवसायनातील आणखी २९८ दूध संस्था जिल्हा उपनिबंधक (दुग्ध), पुणे यांच्याकडे झालेल्या सुनावणीत पात्र ठरल्या होत्या.

अशा प्रकारे एकूण ४९२ दूध संस्थांच्या पात्रतेला इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

४९२ दूध संस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अभिषेक मनू संघवी यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने पात्र ठरलेल्या ४९२ संस्थांचा गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग कायम राहिला आहे.

गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षात या न्यायालयीन याचिकेमुळे आणखी भर पडली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे सहकार क्षेत्रासह गोकुळच्या निवडणुकीतील इच्छुकांचेही लक्ष लागले होते. निकालामुळे निवडणूक प्रक्रियेतील या महत्त्वाच्या न्यायालयीन वादावर पडदा पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT