कोल्‍हापूर : राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्‍या मेळाव्‍यात बोलताना आ. सतेज पाटील. सोबत राजू शेट्टी, आ. जयंत आसगावकर, माजी आ. राजू आवळे, गणपतराव पाटील आदी. (छाया : पप्‍पू अत्तार) 
कोल्हापूर

Gokul Election : 'गोकुळ'मध्ये बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार

आ. सतेज पाटील : ठरावधारक विरोधकांच्‍या गाडीत बसणार; मदत समविचारीला करणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’च्‍या‍ निवडणुकीत ठरावधारक विरोधकांच्‍या गाडीत बसले असले, तरी ते मदत समविचारी आघाडीला करतील. विरोधकांचे अनेक ठरावधारक खासगीत येऊन आपणाला भेटत आहेत. महायुतीमधील घटक पक्षांमध्‍ये असणार्‍या मतभेदांमुळे त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या ठरावांपैकी काही मतदान समविचारीला होईल. एकंदरीत वातावरण पाहता ‘गोकुळ’ निवडणुकीत बिनआवाजाचा बाॅम्‍ब फुटणार, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.

राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्‍या ठरावधारकांचा मंगळवारी (दि. ३०) धैर्यप्रसाद हॉल येथे मेळावा झाला. यावेळी आ. पाटील म्‍हणाले, आमच्‍या सत्ताकाळात आम्‍ही दूध संस्‍था अपात्र केल्‍या नाहीत. विरोधक संस्‍था अपात्र ठरवून ‘गोकुळ’च्‍या पायावरच घाव घालत आहेत.

राजू शेट्टी म्हणाले, ‘गोकुळ’ ‘अमूल’च्‍या घशात घालण्‍याचा विरोधकांचा डाव आहे. माजी आ. राजू आवळे म्‍हणाले, ‘गोकुळ’वर विरोधकांची सत्ता आल्‍यास ‘गोकुळ’ मल्‍टिस्‍टेट होणार, गुजरातला जाणार, संस्‍थेवर दूध उत्‍पादकांचा हक्‍क राहणार नाही. आ. जयंत आसगावकर, रणजित पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, राहुल देसाई, अंजना रेडेकर, विद्याधर गुरंबे, सत्‍यजित जाधव यांची भाषणे झाली. दत्त कारखान्‍याचे चेअरमन गणपतराव पाटील, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, रामराजे कुपेकर उपस्‍थित होते.

सात-बारा दूध संस्‍थांच्‍या नावावर राहिला पाहिजे

‘गोकुळ’ मला मल्‍टिस्‍टेट करायचा नाही, मला चेअरमन व्‍हायचे नाही, टँकर लावायचे नाहीत, घरातील संचालक करायचा नाही, जे काही करायचे आहे ते दूध उत्‍पादकांच्‍या हितासाठी, त्‍यामुळे ‘गोकुळ’च्‍या सात-बारावर पोटकुळांची नावे वाढवायची नसतील, तर समविचारी आघाडीसोबत राहा आणि सात-बारा दूध संस्‍थांच्‍या नावावरच ठेवा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

मोठा भाऊ, देवाभाऊ ठरवणार

‘गोकुळ’मध्‍ये महायुतीचा मोठा भाऊ, उमेदवार मुंबईतून देवाभाऊ ठरवणार आहेत. आमचे मात्र सगळे इथूनच ठरणार आहे. ‘गोकुळ’ कोल्‍हापूरचा असल्‍याने इथेच सर्वकाही ठरले पाहिजे; मात्र विरोधकांच्‍या हातामध्‍ये काही राहिलेले नाही, अशी टीका आ. पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT