Hasan Mushrif on Satej Patil  Pudhari
कोल्हापूर

Gokul Election | गोकुळ रणधुमाळीपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ - आमदार सतेज पाटील यांच्यात 'गुप्तगोष्टी'

भाषणात मंत्री मुश्रीफ यांचा सतेज पाटील यांना मिश्किल टोला

पुढारी वृत्तसेवा

Hasan Mushrif on Satej Patil

कोल्हापूर : काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना बरीच कामे आहेत, तरीही ते वेळेत या कार्यक्रमाला आले आहेत, त्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांना संघर्ष करायचा आहे आणि अनेक लोकांना विश्वासात घ्यायचे आहे, असा मिश्किल टोला वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (दि.८) लगावला.

शिवाजी विद्यापीठातील एका कार्यक्रमानिमित्त मुश्रीफ आणि पाटील आज एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुश्रीफ यांनी पाटील यांच्याबद्दल टोलेबाजी केली. दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीची रंगत सुरू असताना दोघांमध्ये चर्चा आणि त्यानंतर मुश्रीफ यांनी केलेल्या टोलेबाजीची चर्चा सुरू होती.

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी रंगत असतानाच एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे शिवाजी विद्यापीठातील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. मात्र, विशेष म्हणजे दोघांमध्ये बराच वेळ रंगलेली चर्चा उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवणारी ठरली. एका बाजूला महायुतीच्या बॅनरखाली मुश्रीफ निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील राजर्षी शाहू समविचारी आघाडीची मोट बांधत आहेत.

दरम्यान, आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीत समाधानकारक जागा न मिळाल्यास सतेज पाटील आपल्याला लांबचे नाहीत, असे संकेत दिल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आ. शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील चर्चेचा नेमका विषय काय?, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, एकीकडे या दोघांमधील चर्चेसोबतच हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना लगावलेल्या मिश्किल टोल्याचीही चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. सतेज पाटलांना बरीच कामे आहेत, तरीही ते वेळेत या कार्यक्रमाला आले आहेत, त्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांना संघर्ष करायचा आहे आणि अनेक लोकांना विश्वासात घ्यायचे आहे. हे बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावर सतेज पाटलांनी सुद्धा सुरुवात पालकमंत्री आबीटकर आणि तुमच्यापासून करतो, असे सुचक विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT